सोमवार, १८ एप्रिल, २०२२

 मार्केटचे दिवस

मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मार्केटला भाजी वोपण्यासाठी (म्हणजे विकण्यासाठी) जात असे. भाजी म्हणजे कोथिंबीर. पूर्वी जसे सगळे पेपर गांवकरी असत, सायकलला गाडी म्हणत व कोंबड्यांना पक्षी म्हणत तसेच मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू असा भेद नसे, सगळ्या पालेभाज्या या भाजी या एका कॅटेगरीखाली येत असत. तर भाजी घेऊन मी मार्केट गाठत असे. सोबत पोपट नावाचा ड्रायव्हर. पोपट हसतमुख होता, दोन चार शिव्या हासडल्या तरी ‘काय राव...’ म्हणून हसून द्यायचा म्हणून तर तो आमच्याकडे गडी म्हणून टिकला होता. (नंतर कळले या पोपटवर हाफमर्डरचा गुन्हा दाखल होता अन त्याला जेलमधून सोडवून डायरेक्ट मळ्यात कामाला आणले होते. हे कळल्यावर मात्र त्याच्यापासून चार हात लांबच बरे म्हणून त्याला मी माझ्यापुरते दूर केले.) गाडी मार्केटच्या वट्ट्याला (म्हणजे ओट्याला) लावली की भाज्यांचा झेल सुरू व्हायचा. दोन भाज्या झेलून त्याचे रिंगण करून ठेवावे लागत असत. त्यातही निलाव (म्हणजे लिलाव) आठ वाजेच्या पुढे हलला की हे रिंगण मोडून भाजी पसरून ठेवावी लागत असे कारण मध्ये भाजी रचून ठेवल्याने उष्मा निर्माण होत असे व मुंबईपर्यंत माल जाताना सडून जायला नको म्हणून ती पसरवण्यात येई. निलावाची पध्दत मोठी विचित्र, सगळे व्यापारी भाजी तुडवत उभी राहत, कुणी कचाकच पाय देत, तर कुणी इकडून तिकडे फेकत. ही भाजी मुंबईला माणसांना खाण्यासाठी पाठवायची आहे तर हे व्यापारी लोक असे का वागतात हा माझ्या किशोरवयाला प्रश्न पडत असे. अगदी कचऱ्याच्या भावाने ती विकली जाई. त्यावेळी किती पैसा मिळतो यापेक्षा आपला माल विकला गेला व आपण मोकळे झालो ही भावनाच खूप महत्त्वाची होती कारण व्यापाऱ्यांनी पडलेल्या भावात मागितलेली भाजी त्यांना द्यायची नाही तर परत घेऊन जाऊन तिचे करायचे काय असा सवाल असायचा. (त्यानंतर आपण आपला माल रस्त्यावर का फेकून देतो हे मला उमगायला लागले) सकाळपासून ताईने एवढ्या कष्टाने काढलेल्या भाजीचा असा कचरा होताना पाहून डोळ्यात पाणी यायचं पण पर्याय काहीच नसायचा. व्यापारी बोली लावून कागदाचा एक चिटुरा भाजीवर फेकून निघून जायचे. त्यानंतर सगळी भाजी भोतात (म्हणजे गोणी) भरून व्यापाऱ्याचे लोक घेऊन जात. यात व्यापारी जेवढे नाचले त्यापेक्षा जास्त हे लोक भाजीवर नाचत व सकाळी आम्ही या भाजीच्या जुड्या एखाद्या लहान बाळाला अलगदपणे आणावे तशा घेऊन आलेल्या असायचो आणि येथे मात्र तिचे हे हाल होत असत. भाजी एकदा व्यापाऱ्याच्या ताब्यात दिली की पैसे घेण्यासाठी लायनीत उभे राहायचे. चिटुरा खिडकीतून मध्ये सरकवायचा आणि माल उभा करेपर्यंत लागलेल्या पैश्याच्या निम्मे पैसे घेऊन आपण माल विकला या आनंदात मार्केट कमिटीच्या बाहेर यायचो. आता मजेचा पार्ट सुरू व्हायचा. पोपट व मला मार्केटला यायला का आवडायचे तर माल विकून झाल्यावर गोसावी बाबाच्या हॉटेलात गरमागरम दोन ब्रेड सँडविच आणि कढी खायला मिळायची. घमघमणाऱ्या काळ्याकुट्ट तेलात, अर्धे अधिक तळलेले ते दाळीच्या पिठातले ब्रेड आणि कढी याची सर आज कशालाच नाही. मार्केटचे ते दिवस छान होते. रात्रीची वेळ, सर्व भाज्यांचा एकत्र झालेला सुगंध, काकड्या, भोपळे, दोडके, कारले, गिलके, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो हे सारे आजूबाजूला कॅरेटच्या कॅरेट ठवलेले मेथी, पालक, शेपू, कांद्याची पात आजूबाजूला पसरवलेली. हॅलोजनचा पिवळा उजेड आणि खर्चाच्या निम्मेच मिळालेले पैसे घऊन घराकडे निघालेला मी. बाकी सारं स्तब्ध. आता ताई अंगणातल्या चुलीवर भाकऱ्या थापत असेल आणि चुलीतले निखारे बाहेर ओढून भाकरीला जाडसर पापुडा आणला असेल. शेजारी हिंदेलेमच्या पातेल्यात भात रटरटत असेल. वेलीवरून तोडलेल्या ताज्या गिलक्याची भाजी आणि जोडीला ताईच्या मायेसारखेच मुरलेले लोणचे. नाना बाजेवर रेडिओ लावून सिलोन ऐकत असलेले अन दादा पुस्तकात डोके खुपसून बसलेला. शहरात आल्यावर कळतं आपण काय हरवून आलोय. माणसे निघून जातात, भाजी विकायला गेलेलो मी तोच आहे पण स्थित्यंतरे किती. बेचाळीस वर्षात काय पायाखालून गेले काय सांगणार, किती सांगणार?

रविवार, ३ एप्रिल, २०२२

 

।।श्री स्वामी समर्थ।।

मै गया नहीं, जिंदा हूँ

आज चैत्र शुद्ध द्वितीया. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. हस्तिनापूरातील (दिल्ली) छेली खेडा नावाच्या ग्रामी शके १०७१ (इ.स. ११३९) मध्ये श्री स्वामी महाराजांची अष्टवर्षीय बालमूर्ती धरणी दुभंगून प्रकट झाली. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत असताना या लुटूपुटीच्या खेळात समोरच्या भीडूवर म्हणजे तेथे असलेल्या गणेशाच्या मूर्तीवर डाव आलेला असताना विजयसिंग याने हट्ट धरला की देवा हा डाव तू खेळावा, आणि त्याच्या बालहट्टाला भुलून एक अष्टवर्षीय मूर्ती तेथे धरणी दुभंगून वर आली. हेच श्री स्वामी समर्थ महाराज होय. हा काळ प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आधीचा काळ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा काळ १३२०. आंध्रप्रदेशातील सुमती व आपळराजा यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ आले ती कथा सर्वज्ञातच आहे. पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी भोजन सिद्ध करून ब्राह्मणांची वाट पाहणाऱ्या सुमतीदेवी यांच्यासमोर येऊन यतीने याचना करताच त्या साध्वीने त्यांना अन्न दिले. यावर प्रसन्न होऊन यतीराजांनी आपले खरे रूप प्रकट केले, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे दत्तात्रेयांचा, १८०० मध्ये झालेला तिसरा अवतार म्हणजे स्वामी महाराज हा समज थोडाकाळासाठी बाजूला पडतो. तो केवळ प्रकट होण्याचा कालावधी आहे हे लक्षात घ्यावे. प्रकट होण्याचा म्हणजे जन्म होण्याचा नव्हे तर समाजासमोर येण्याचा काळ. आसेतू हिमालय भ्रमण करीत असताना देहरूपाने प्रकट होण्याचा काळ जवळ आला आहे असे जाणून इ.स. १८५६ च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ६ एप्रिल १८५६ हा होता. (येथे एक जाणवते की हस्तिनापूरातील छेले खेडा ग्रामी प्रकट होण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया हीच होती.) स्वामी महाराजांनी ज्यांना आपला सूत मानला, त्या स्वामीसुतांनी (हरिभाऊ दाजिबा तावडे) ही वरील कथा अक्कलकोटात सांगितली व त्याला स्वामींनी दुजोराही दिला आहे. स्वामीसूतांनी सांगितल्याप्रमाणे अहमदनगरचे पिंगळा ज्योतिषी नाना रेखींनी स्वामींची कुंडली बनवली. त्याला स्वामी महाराजांनी मान्यता दिली व ‘नौबत बजाव’ म्हणून आनंदही व्यक्त केला. यावेळी स्वामी अक्कलकोटात शेखनुर दर्ग्यावर बसलेले होते. तेथील नौबत म्हणजे नगारा नाना रेखींनी जसा जमेल तसा वाजवला, स्वामी खदाखदा हसून त्यांना प्रसन्न झाले व त्यांच्या हातावर आपला हात जोरात आपटून ‘ये ले आत्मलिंग’ म्हणून त्यांना पहायला लावले तर नाना रेखींच्या उजव्हा हातावर विष्णुपद उमटले होते. ते शेवटपर्यंत तसेच राहीले. (याबाबतच पुरावे अहमदनगरच्या नाना रेखी यांच्या वाड्यात जिज्ञासूंना पहायला मिळतील) जन्मकाल बहुधान्य नाम संवत्सरे १०७१ चैत्र शुद्ध द्वितीया, अश्विनी नक्षत्राचे २ रे चरण. प्रीतीयोग गुरूवार, जन्म दोन घटका दिवसास. आद्य नाडी, देवगण, यजुर्वेदी, काश्यप गोत्र, टोपणनाव नृसिंहभान, जन्मनाव चैतन्यस्वामी. मेष राशी, राशीस्वामी मंगळ (संदर्भ : श्री गोपाळबुवा केळकर उर्फ प्रीतीनंद स्वामीकुमार यांनी लिहिलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर, संपादन : रा.चिं.ढेरे

एका अर्थाने स्वामींचे प्रकटीकरण दोनवेळा झाले, ते ही चैत्र शुद्ध द्वितीयेलाच. त्यामुळे आजच्या दिवशी स्वामींचा प्रकटदिन मानला जातो व भक्त मंडळीमध्ये तो अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. खालील अभंग स्वामीसुतांनी लिहिलेला आहे, यात स्वामींच्या जन्माची कथा येते. स्वामीसुतांचा जन्मच मुळी श्री स्वामी समर्थांचे प्रकटीकरण कसे झाले हे सांगण्यासाठी झाला होता.  

दत्त माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥०१॥

छेलीखेड्या ग्रामामाजीं । झाला अवतार हा सहजी ॥०२॥

गोटी खेळण्याचा रंग । तेव्हां मनी झालो दंग ॥०३॥

तेथे होता विजयसिंग । आतां येथे करू रंग ॥०४॥

गजानन आनंदला । पाहुनियां त्या खेळाला ॥०५॥

नाचताती चहू कोणीं । नुपुरें वाजतीं चरणीं ॥०६॥

गोटी गोटीचा हा वाद । हरीचा हसण्याचा छंद ॥०७॥

हंसू लागे वक्रतुण्ड । हलवूनी प्रीती सोंड ॥०८॥

विष्णु स्तंभी प्रकटलें । दत्त गोटी फोडूनि आले ॥०९॥

माझ्या स्वामीचीं करणीं । कंप होतसे धरणीं ॥१०॥

गोटी विजयसिंग मारी । दुसरी गोटी होय करीं ॥११॥

गोटींचा हो पडला ढिग । चकित झाला विजयसिंग ॥१२॥

गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं ती शोभली ॥१३॥

गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा हा खेळ ॥१४॥

एक प्रहर खेळ केला । समर्थ दाविली ती लीला ॥१५॥

स्वामीसुत म्हणे झाला । अवतार भक्तांच्या काजाला ॥१६

(संदर्भ : श्रीदत्तमहाराज डॉट कॉम वेबसाईट)

 

पुराणांमध्ये काही लोकांचे वर्णन आले आहे त्यापैकी दत्तलोकातून पृथ्वीवर काही पूर्णावतार सिद्ध आले. तेथीलच एक ठिकाण म्हणजे कर्दलीवन. कर्दळीवन हे जे आता आपण पहातो, ऐकतो किंवा त्याच्या वाऱ्या करतो त्याच्याशी स्वामी महाराजांचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही. कर्दलीवन हा दत्तलोकातील एक भाग, तेथून श्री स्वामी समर्थ आलेले असा एक संदर्भ आढळतो.     

(संदर्भ : श्रीदत्त संप्रदाय या मालिकेतील चैतन्यप्रेम व रोहन उपळेकर यांच्यातील संवाद)

 

महाराज प्रारंभी काशीमध्ये राहीले. गंगासंगमी बराच काळ व्यतीत केला. त्यानंतर कालिमातेच्या दर्शनासाठी ते कलकत्ता गेले. बंगालमध्ये काही काळ राहून त्यांनी तेथेही असंख्य लिला दाखवल्या. देवलग्राम येथे जाऊन त्यांनी पादुका स्थापन केल्याचाही उल्लेख आहे. पुढे मोगलाईत जात राजूर येथे मठ स्थापन केला व आठ गावाची जहागिरदारी मिळवून देत पुढे चालते झाले. येथे महाराजांनी चंचलभारती हे नाम धारण केलेले होते. पुढे रामेश्वर, उडपी, पंढरपूर व नंतर मंगळवेढे असा हा प्रवास आहे. अक्कलकोटात प्रकटण्याआधी स्वामी महाराज काही काळ (१२ वर्षे) मंगळवेढ्यास थांबले होते. हा काळ शके १७६० चा होता. तेथे ते ‘दिगंबरबुवा’ नावाने प्रसिद्ध होते. पंढरपूर, बेगमपूर व मोहोळास आल्यावर एके दिवशी स्वामी अक्कलकोटात आले. (इ.स.१८५६) स्वामींचे वय बहुत होते, त्यांना ज्यांनी पाहीले त्यांनी ते खूप जुनाट पुरूष असल्याचे कबूल केले होते. परंतु येथे एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की उद्धव नावाच्या लाकुडतोड्याची कुऱ्हाड कर्दळीवनात वारूळावर पडली, रक्त आले, ती जखम मांडीवर नंतरही होती या वदंता आहेत. स्वामी हे सर्वकाळ होते, त्यांना कोणत्याही तपश्चर्येची गरज नव्हती. ते स्वत: पूर्णावतार आहेत. 

स्वामी मनकवडे होते, अनेकांच्या मनातील विचार ते ओळखत व त्याप्रमाणे त्याला सांगत. त्यामुळे महाराजांकडे दु:ख सांगायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. स्वामी अगदी सामान्य माणसासारखा व्यवहार करत असत त्यामुळे जे मुमुक्षु आहेत त्यांनाच ते परब्रह्म असल्याचे कळत व त्याप्रमाणे ते त्यांना पूजत असत. अक्कलकोटात चोळाप्पा महाराज, बाळाप्पा महाराज, ब्रह्मचारीबुवा, आनंदनाथ महाराज हे कार्यरत असताना तेथे हरिभाऊ तावडे यांच्यासारखा सामान्य माणूस येतो व पहिल्याच भेटीत स्वामी महाराज त्यांना आपलेसे करतात. यावरून श्री स्वामी महाराजांची पात्रता पाहून स्वीकारण्याची भूमिका लक्षात येते. स्वामी महाराज, ‘माझी ध्वजा उभार’, ‘माझा किल्ला बांध’, ‘देऊळ उभे कर’, ‘घरदार लुटव’, ‘संसारावर तुळशीपत्र ठेव’ यासारख्या सूचना हमेशा करत. स्वामींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते खडी हिंदुस्थानी बोली बोलत. त्यांच्या बोलण्यात हिंदी शब्दांचा उच्चार मोठ्या प्रमाणात होता. महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अनाकलनीय होते. त्यांची भाषा शिवराळ असली तरी ज्यांना उद्देशून ते बोलले त्यांचे कल्याणच झाल्याचे पुढे पाहण्यात येते.      

स्वामींना देहाचे जीर्ण वस्त्रे बदलण्याची वेळ झाली तेव्हा ते बोलले होते की, ‘ही लोकं उद्या माझा बाजार मांडतील’ आज जेव्हा आजूबाजूला दिसते की भक्तीचा अक्षरश: बाजार मांडला आहे. स्वामी खूप दयाळू आहेत, केवळ हाक मारल्याने ते येतात असा अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी कोणत्याही रूपया पैशांची गरजच नाही. श्री स्वामी समर्थांचे शिष्य प.पू. पिठले महाराज नेहमी सांगायचे, ‘सबसे बडा गुरू...गुरूसे बडा गुरू का ध्यास...और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज.’ महाराजांविषयी आणखी काय बोलावे? ।।श्री स्वामी समर्थार्पणमस्तू ।।

प्रशांत भरवीरकर

p.bharvirkar@gmail.com

९५०३६७७७४०

बुधवार, १६ मार्च, २०२२

अर्धे नव्हे पूर्ण...!

 

अर्धे नव्हे पूर्ण...!

महाराष्ट्रात पूर्वापार साडे तीन शक्तीपीठ म्हणून जे पूजले जातात त्यापैकी अर्धे पीठ मानण्यात आलेले (कोणताही शास्त्राधार नाही) वणीच्या सप्तश्रुंगी देवीचे ठिकाण हे खरे तर महाराष्ट्रातील एकमेव पूर्णपीठ आहे. आश्चर्य वाटले ना? परंतु सत्यं वदं, हेच खरे आहे. भागवत पुराणात मात्र एकशेआठ शक्तीपीठांचा उल्लेख असून त्यापैकी तीन महाराष्ट्रात असल्याचे सांगण्यात आले आहे. सती मातेची हनुवटी वणी गडावर पडल्याने तेथे हे शक्तीपीठ निर्माण झाले, ते स्वयंभू आहे. त्यामागे आख्यायिका आहे. (अर्थात काही ठिकाणी भद्रकाली परिसरातील भद्रकाली मातेचे मंदिर हे हनुवटी पडण्याचे ठिकाण मानले जाते.) सती ही ब्रह्माचा पुत्र दक्ष प्रजापतीची कन्या. दक्ष प्रजापतीने कनखल (हरिद्वार) येथे आयोजित केलेल्या ‘बृहस्पति सर्व’ नामक यज्ञसमारंभाप्रसंगी कन्या सती व जामाता शंकर यांना हेतूपुरस्सर आमंत्रित केले नाही. परंतु पित्याने केलेला यज्ञ म्हणून सती तेथे गेली व तेथे दक्षाने सर्व देवीदेवतांना हविर्भाग अर्पण केल्यावर शंकराला मात्र तो दिला नाही याचा अपमान वाटून सतीने यज्ञकुंडात उडी घेतली व शरीर नष्ट केले. अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळताच शंकरांचा संताप अनावर झाला व त्यांनी वीरभद्रास यज्ञ नष्ट व सर्वांना शासन करण्यास सांगितले. जळालेले सतीचे कलेवर घेऊन ते त्रिलोकात फिरू लागले तेव्हा हाहाकार माजला आणि महाविष्णुंनी सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे तुकडे केले. ते जेथे जेथे पडले तेथे शक्तीपीठांची निर्मिती झाली. सतीमातेची हनुवटी जेथे पडली त्या डोंगरावर शक्तीपीठ निर्माण झाले. कालांतराने त्याला सप्तश्रुंग गड म्हणण्यात आले. हीच माता सप्तश्रुंगी. आदिमाया भगवती खुद्द येथे विराजमान आहे. येथे देवीला भ्रामरी नावाने संबोधण्यात येते, विकृताक्ष हा येथे मातेचा भैरव आहे. तो मातेच्या खालीच दहा पायऱ्यांवर आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावांचा आद्यग्रंथ लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथसंप्रदायाच्या नवनाथ भक्तीसार या ग्रंथात दुसऱ्या अध्यायात असे वर्णन येते की, गुरू दत्तात्रेय व महादेव अरण्यात गमन करत असताना महादेवांना तेथे कुणीतरी योगी तपश्चर्या करत असल्याचे कळते ते दत्तगुरुंना त्यांना आणण्यासाठी पाठवतात तर ते मच्छिंद्रनाथ असतात. हे दोघे त्यांना सांगतात की, तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल आणि शाबरी विद्येची खरी सुरुवात सप्तश्रृंग गडावरून होते. संत निवृत्तीनाथांनीदेखील समाधी घेण्यापूर्वी काही काळ सप्तशृंग गड येथे साधना केली असल्याचे उल्लेख आहेत. साईबाबांच्या काळातीलही एक संदर्भ देता येईल बाबांनी आपल्या एका भक्ताची मनोकामना पूर्ण होण्यासाठी सप्तशृंगी मातेला नवस केला होता व ते दर्शनासाठी येथे आलेही होते. या देवीचा विडा प्रसाद म्हणून नेण्याची परंपरा भक्तांमध्ये आहे. नागवेलीचे पान, काथ, चुना व सुपारी टाकून बनविण्यात येणारा विडा वणीची देवी आदिमाया सप्तश्रुंगी मातेच्या मुखात ठेवला जातो. विड्याच्या पानाची उत्पत्ती कथा मजेशीर आहे, त्यातील फॅण्टसी थोडी बाजूला ठेवून गर्भितार्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपली संस्कृती किती व्यापक आहे. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने हे उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून एक वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले. भोजन झाल्यावर देव देवता या नागवेलीच्या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यातूनच पुढे महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा ठेवण्यात येऊ लागला. त्यावेळी सर्व देवांनी या विड्यास आशीर्वाद दिला की आम्ही तुझ्यामध्ये वास करू आणि सर्व देवीदेवता त्यात विराजमान झाले. त्यामुळे विड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विषय आहे, सप्तश्रुंगी मातेच्या विड्याचा. देवीच्या मुखात पूर्वापार विडा ठेवण्यात येतो. मानवी देहामध्ये शक्तीचे सात पुंजके असतात, कुणी त्याला कुंडलिनी म्हणते, कुणी आणखी काही. या शक्तीपुंजक्याला सकारात्मक ऊर्जा हा विडा देतो. नागवेल हादेखील एक शक्तीपुंज आहे. वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या मुखातील नैवेद्य असलेल्या नागवेलीच्या पानाने देहात वाणीशक्ती प्राप्त होत असते. शरीरामधल्या डिस्टर्ब झालेल्या मार्गाला वणीच्या देवीचा हा प्रसाद दुरुस्त करतो. तमोगुण, रजोगुण व सत्त्वगुण हे पूर्णपणे जागृत झाल्यानंतर तुम्ही देवत्वाकडे जातात, तुम्ही सिद्ध होतात. भक्ती-शक्तीचे पीठ असलेल्या गडावरच्या देवीकडे आपण काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे. ही देवी आध्यात्मिक देण्याचे सामर्थ्य ठेवते त्यामुळे तिच्याकडे ते मागा. आपण मनोमन जे मागतो ते देवी ऐकत असते. आपल्या मनातले भाव ती ओळखत असते. परंतु तरीही देवाजवळ काही मागावयाचे असल्यास ते मोठ्याने मागा. तुम्ही बोलल्याने जे शब्द बाहेर येतात, त्या स्पंदनांमध्ये तो वर पूर्ण करण्याची शक्ती असते.

 

संदर्भ : मार्कंडेय ऋषी रचित मार्कंडेय पुराण

देवी सप्तशती 

धुंडिसूत मालूकवी रचित नवनाथ भक्तीसार

देवी भागवत व देवी विजय 

गणपती

 

गणपती

 

गणानां त्वं गणपति हवामहे । प्रियानां त्वां प्रियपती हवामहे।।

निधीनां त्वां निधीपती हवामहे। वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम।।

 

प्राचीन हिंदू धर्मग्रंथ ऋग्वेदात गणपती देवतेचा वरील उल्लेख प्रथम मिळतो. इतर कोणत्याही दैवतापेक्षा अधिक वैविध्य गणपती या देवतेमध्ये आहे. याचे कारण म्हणजे वैदिक काळापासून गणपतीचे अनेक अवतार मानण्यात आले आहेत. प्रत्येक काळात गणपतीचा एक अवतार मानण्यात येतो. गणपतीच्या जन्माच्या वेगवेगळ्या हकीकती आहेत पैकी देवीपुराणानुसार शक्तिस्वरूप माता पार्वतीने अंगमळापासून केलेल्या पुतळ्यात प्राण फुंकले व स्नान करण्यासाठी गेली असता महादेव तेथे येऊन प्रवेश मागू लागले. त्यातून दोघांचे युद्ध होऊन महादेवाने त्याचा शिरच्छेद केला. हे कळताच माता पार्वती आक्रोश करू लागल्या व महादेवाने उत्तरेकडील प्रथम जो दृष्टीस पडेल त्याचे शीर आणावयास सांगितल्याने हत्तीचे शीर आणून या पुतळ्याला जोडण्यात आले व गणपतीचे निर्माण झाले. ही कथा अधिक प्रचलित आहे. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार माता पार्वती गदापद्मधारी श्रीकृष्णाच्या रूपावर मोहित होऊन असाच पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली असता श्रीकृष्णांनी गर्भात शिरून गणपतीचे रूप धारण केले ही एक कथा आहे. स्कंद पुराणात सिन्दूर नावाच्या दैत्याने माता पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्त छिन्न केले. जन्मानंतर नारद मुनींच्या सांगण्यानुसार गजराजाचे शीर जोडण्यात आले.  

गणपतीच्या अनेक नावांपैकी दोन नावे म्हणजे बृहस्पति व वाचस्पति ही नावे ऋग्वैदिक काळात अधिक प्रचलित होती. ज्योतिर्मय मानल्या गेलेल्या या देवतेचा वर्ण लालसर होता. अंकुश व परशु ही शस्त्रे तिच्या हाती होती तर ‘गण’ नावाच्या शिव पार्वतीचे सेवक असलेल्या, नृत्य करणाऱ्या एका दलाबरोबर ही देवता कायम रहात असल्याने तिला ‘गणपती’ असे संबोधन होते. गणांचा अधिपती, देवांचा रक्षक अशीही गणपतीची प्रतिमा आहे.(१) दुसऱ्या एका मतानुसार अनार्यांची हस्तिदेवता व यक्ष यांच्या एकत्रीकरणातून गणपतीची निर्मिती झाली असा उल्लेख आहे, गणपतीचे वाहन उंदीर असून ते अनार्यांच्या आदिम संस्कृतीचे प्रतिक असल्याचेही मानण्यात येते.(२,३) तंत्र मतानुसार देवी सरस्वतीला गजाननाची पत्नी मानण्यात येते. त्यामुळेच ‘संगे सरस्वती घेऊन आले गणपती गजानन’ अशी गीते पुढे प्रचलित झाली. रिद्धी सिद्धी या गणपतीच्या दोन पत्नी असेही सांगण्यात येते. तर तंत्रमार्गात ‘गणेशानी’ ही गणपतीची पत्नी मानण्यात येते. गणेशाला तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या इतर नऊ पत्नी असल्याचेही उल्लेख आहेत.  

चौथ्या शतकातील कालिदास, पाचव्या शतकातील पंचतंत्र किंवा भरताचे नाट्यशास्त्र तसेच सहाव्या शतकातील भारवी यांच्या काळात गणपतीचा कोठेही उल्लेख आढळत नाही.  गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात. (४) गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो.या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते.(५) हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र, गणेश गायत्री मंत्र आहे. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हो तो मंत्र. आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढली. गणपतीच्या उपासकांचा ‘गाणपत्य’ संप्रदाय निर्माण झाला. या शतकांमध्ये गणपतीचा उल्लेख नसला तरीही इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण करण्यात आलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीन गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशाच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभुज दगडी गणेशमूर्ती पहायला मिळते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणाऱ्या गणपतीची मूर्तीही मिळालेली आहे. जबलपूर येथे हत्तीमुख असलेल्या देवीची मूर्तीदेखील मिळाली आहे. तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी ‘गणेशानी’ हीच असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे.

गणपतीचे महान कार्य म्हणजे व्यास मुनींनी सांगितलेले महाभारत लिहिण्याचे काम. महाभारताच्या युद्धानंतर व्यथित होऊन व्यासमुनी बसलेले असताना त्यांना सर्व गोष्टींचे स्मरण होऊ लागले तेव्हा त्यांनी महाभात नावाने एका महाग्रंथाची निर्मिती करण्याचा विचार केला अआणि बुद्धीचे दैवत गणपतीला आपले लेखनिक बनण्याची विनंती केली. सांगताना थांबायचे नाही अशी अट गणरायाने तर समजल्याशिवाय श्लोक लिहायचा नाही अट व्यासांनी घातली आणि महाभारताचे निर्माण झाले. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार महाविष्णुंचा अवतार मानल्या गेलेल्या परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून ते कैलास पर्वतावर आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांना अडवले तेव्हा दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांनी आपल्या परशुने गणेशाचा एक दात तोडला. (म्हणून तो एकदंत) याच दाताचा उपयोग महाभारत लिहिताना लेखणी म्हणून केला गेल्याचे अनेक ग्रंथामध्ये सांगितले गेले.   

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङ्मयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या ‘रुक्मिणीस्वयंवर’ ग्रंथात गणपतीचा पुढील उल्लेख येतो, ‘तेया गणरायाचे उदार रूपडे। थोरपण जिंकले होडे ।।’ तर ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभीच ज्ञानेश्वरांनी गणरायाला नमन केले आहे, ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। देवा तुचि गणेशु । सकल मतिप्रकाशु। म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ।। त्यानंतर संत नामदेव, संत तुकाराम यांनीही आपल्या अभंगातून गणरायाचा उल्लेख केला आहे. गणपती लोकसाहित्यातही आहे, तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो. तर अशा या गणपतीला पेशव्यांच्या पुजनात मानाचे स्थान होते. एका मान्यतेनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाही गणेशाचा जन्म मानण्यात येतो. पेशवे हाच काळ मानत असत, त्यातून गणरायाच्या पुजनाची परंपरा पुढे आली. पेशव्यांच्या काळात केवळ घराघरात पुजला जाणारा गणपती लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक स्वरूपात आणला. लोकांच्या एकत्रीकरणातून स्वराज्य मिळवण्यासाठी चर्चा झडतील असा त्यामागचा उद्देश होता. परंतु टिळकांनी गणेशाच्या पुजनास उत्सवाचे दिलेले स्वरूप सुधारकी व सनातनी दोन्ही विचारधारेला मान्य झाले नाही. त्यामुळे टिळक महाराजांवर प्रचंड टिका झाली. काही जणांच्या म्हणण्यानुसार याआधी केवळ निसर्गदत्त प्रतिकांची पुजा करण्यात येत होती. गणपतीच्या पुजेनंतर देवीदेवता प्रचलित झाले परंतु या विधानास कोठेही पुरावा सापडत नाही.

खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांच्या मतानुसार भाद्रपदात शेतात धान्य तयार होतं. पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गणपती. म्हणूनच पार्थिव गणेशपूजन असं पंचांगात लिहिलेलं असतं. पृथ्वीची कशी पूजा करणार म्हणून प्रथम पूजन करायच्या गणपतीला नदीकिनारी असलेल्या मातीतून निर्माण करायचं, तिथेच त्याची पूजा करायची आणि लगेच तिथेच विसर्जन करायचं अशी पद्धत होती. अजूनही दक्षिण हिंदुस्थानात हीच प्रथा आहे.

गण म्हणजे समूह. आपण देव, राक्षस, मनुष्य, ऋषी, पितर हे गण म्हणतो. या  सर्व गणांचा अधिपती जो आहे तो गणपती. मूळात सृष्टी ही अव्यक्त होती तिला व्यक्त रूपात येण्याची इच्छा झाली, हा जो बहुधा भाव (एकोहम बहुस्याम) तोच विश्वाचे कारण आहे. हा बहुस्याम भाककव म्हणजे गण. या गणांमध्ये जो सर्वप्रथम आला तो गणपती. त्यापासून पुढे सर्व निर्माण झाले. विज्ञानाच्या भाषेत यालाच युनिव्हर्सल म्हटले जाते. यातून एकच गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की आपण गणपतीची पूजा करतो म्हणजे आपल्या मूळाची पुजा करतो. ‘त्वं मूलाधार: स्थितोसि नित्यम’ हे जे गणपती अथर्वशीर्षात येते ते त्याच कारणाने. गणपती म्हणजे आपल्याला या युनिव्हर्सलसोबत बांधून ठेवणारा बिंदू, ‘बिंदुरूत्तररूपम’ हे त्यातूनच आलेय. म्हणून गणपतीची पूजा म्हणजे मुळाची, मुळ चेतनेची पुजा आाज करूया व विशश्वचैतन्य शक्तीसोबत स्वत:ला जोडून घेऊया. 

ॐ गं गणपतये नम:     

 

संदर्भ :

१. Gadgil, Sadashiv Ramchandra (1974). Lokāyata. Loka Vāñmaya Gr̥ha.

२. Hindu Gods and Goddesses, Swami Harshananda, Sri Ramakrishna Math, Chennai, 1981, p.125-27

३. Jain, Sandhya (2018). Aadidev Aarya Devata (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352668731.

४.  Higham, Charles (2014-05-14). Encyclopedia of Ancient Asian Civilizations (इंग्रजी भाषेत). Infobase Publishing. ISBN 9781438109961.

५.  Gune, Dr Ashok Modak, Prof Prabhakar Nanakar, Prof Narayan (2019). Desh-Videshon Ki Rashtriya Vichardharayen (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789353221553.

६. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

नाथपंथ

 

नाथपंथ

‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा’ हे वचन प्रसिद्ध आहे. आदिनाथ म्हणजे महादेव, शिवशंकर भगवान. या सृष्टीमध्ये जे काही आहे ते शिव आहे. शिवतत्त्व हे सृष्टीला जन्म देणारे, पालन करणारे व संहार करणारे अशा व्यापक स्वरूपात आहे. या पृथ्वीवर जे सिद्ध झालेत, जे आहेत व यापुढेही सामान्य जीवांना मार्गदर्शन करीत राहणार आहेत त्या सर्व सिद्धांचे गुरू म्हणजे आदिनाथ. आणि ते सिद्ध म्हणजे नाथ, नाथपंथीय सर्व. नाथपंथीयामध्येही प्रामुख्याने नवनाथ. त्यातही केंद्रभागी मच्छिंद्रनाथ (कुणी मत्स्येंद्रनाथही म्हणते) व गोरक्षनाथ. आपण कधीपासून नवनाथांना ओळखतो तर धुंडिसूत मालुकवींनी नवनाथ भक्तीसार ग्रंथ लिहिला, श्रावणात आपण त्याची पारायणे केली तेव्हापासून. अध्याय संपतो तेव्हा ‘संमत गोरक्षकाव्य किमयागार’ अशी मुद्रा तेथे आहे. ‘किमयागार’ नावाचा ग्रंथ गोरक्षनाथांनी सिद्ध केला त्यातून ही कथा घेण्यात आल्याचे मालुकवींनी म्हटलेय (यात अनेक वाद आहेत, गोरक्षनाथांनी किमयागार ग्रंथ लुप्त केला होता तर यांना कसा मिळाला वगैरे) तर आपली व नवनाथांची ओळख भक्तीसार ग्रंथापासून झाली, नाथ प्राचीन आहेत. आठव्या शतकात हा संप्रदाय उदयास आला, नवव्या शतकात मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ आले. अशी मान्यता आहे की, मत्स्येंद्रनाथ मासळीच्या पोटातून तर गोरक्षनाथ गोवरीच्या राखेतून जन्माला आले. त्यानंतरच्या अनेक कथा, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. गोरक्षनाथांबरोबरच अत्यंत महत्त्वाचे म्हणून जालंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरीनाथ, रेवणनाथ, अडभंगनाथ, वटसिद्ध नागनाथ, चौरंगीनाथ यांचा उल्लेख होतो. शिवशक्ती व भगवान दत्तात्रेय ही नाथपंथाची आराध्य. यापैकी अनेक नाथांना दत्तप्रभूंनीच अनुग्रह दिल्याचे उल्लेख भक्तीसारमध्ये येतात. दत्तप्रभू व गोरक्षनाथांच्या भेटीचे उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. रैवतक पर्वत (आताचा गिरनार) येथे गोरक्षनाथांचे स्थान व दत्तात्रेयांचे स्थान आहे, यावरून त्यांच्या भेटीची पुष्टी मिळते. गुरू गोरक्षनाथांना भगवान शंकराचा अवतार मानले जाते म्हणून त्यांना शिवगोरक्ष असेही म्हटले जाते. नवव्या शतकातील गोरक्षनाथ परमयोगी असल्याने चिरंजीव आहेत. त्यांचा संचार सर्वत्र असतो. त्याचे प्रमाण म्हणजे उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने बनवलेले पंचाग. विक्रम संवत या पंचागांची सुरूवात अकराव्या शतकातील आहे. या विक्रमादित्याचा लहान भाऊ राजा भर्तृहरीला गोरक्षनाथ भेटल्याचे उल्लेखही आढळतात. गोरक्षनाथ संत कबीर व गुरूनानक देव यांना भेटल्याचेही उल्लेख आहेत. मत्स्येंद्रनाथ यांचा काळ नवव्या शतकातील आहे याच्या पुष्टीकरीता त्यांनी लिहिलेल्या ‘कौल ज्ञान निर्णय’ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. (या ग्रंथातील लिपी अकराव्या शतकाआधीची आहे हे डॉ. प्रबोधचंद्र वागची यांनी १९३४ मध्ये लिहिलेल्या कलकत्ता संस्कृत सिरिज मध्ये म्हटले आहे.) ९७५-१०२५ हा ज्यांचा कालावधी मानला गेला आहे, त्या अभिनवगुप्त यांनी ‘तंत्रलोक’ ग्रंथाच्या सुरूवातीला मत्स्येंद्रनाथ यांना प्रणाम केला आहे, यावरून त्यांचा कालावधी निश्चित करण्यास मदत होते. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात अडकले तेव्हा गोरक्षनाथांनी गीतगायन करून त्यांची सुटका केल्याचेही भक्तीसारमध्ये आले आहे. (वात्सायनच्या म्हणण्यानुसार सध्याचे दक्षिण गुजरात, बारबोसाच्या म्हणण्यानुसार सकोतरा बेटावर (सकोतरा बेट हे येमेनच्या दक्षिणपूर्व बाजूस आहे. तसेच एका चिनी पर्यटकाच्या म्हणण्यानुसार हिंदी महासागराच्या पूर्व भागातील एका भूभागात स्त्री राज्य होते.) मुळात स्त्री राज्यात पुरूषांना मोहिनी घालून ठेवले जायचे, तेव्हा वशीकरणाचे प्राबल्य होते. मत्स्येंद्रनाथांवर वशीकरण झाले तेव्हा गाण्याच्या स्वरातून गोरक्षनाथांनी ते निष्प्रभ केल्याचे उल्लेख सापडतात. घोड्याच्या लिदीमध्ये बारा वर्षे राहिलेले जालंदरनाथ असोत की वाताकर्षण अस्त्राच्या साहाय्याने लवंग वनातील विविध मधुर फळे आकाशमार्गाने आणणारे कानिफनाथ असोत नाथसंप्रदाय हा सामान्य माणसासाठी नेहमीच आकर्षण राहीला आहे. तो आकर्षण का राहिला त्यालाही कारण आहे, अतिमानवीय जे काही आहे त्याचे नेहमीच सामान्य माणसाला आकर्षण असते. वायुगमन अस्त्र, वाताकर्षण अस्त्र, संजीवनी विद्या याचा नाथांनी केलेला चपखल वापर आणि त्यांचे देवादिकांना हरवून अँग्री यंग मॅन असल्याचे कोठेतरी माणसाच्या मनावर ठसते. एक कुसुम झोकुनि वरती। चला म्हणावे मम कार्याप्रती। नवनाथ वंदुनि उक्ती। नमस्कार करावा।। हे उगाचच म्हटले गेलेले नाही. त्यांच्या केवळ स्मरणाने आज माणसाला संरक्षित झाल्यासारखे वाटते. श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र, हरिविजय, देवीविजय, भागवत यांची जितकी पारायणे होतात, तितकीच किंबहुना त्याहून अधिक पारायणे नवनाथ भक्तीसार ग्रंथाची होतात. जनमानसात नाथांनी अद्याप गारूड केलेले आहे ते उगाच नाही.   

---

संदर्भ :

नवनाथ भक्तीसार : धुंडिसुत मालूकवी

अमोघ : चंद्रहास शेट्ये : कोमल प्रकाशन  

गोरखदर्शन : गोरखनाथ मंदिर, गोरखपूर 

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

गोरखधंदा

 गोरखधंदा

१९ ऑगस्ट २०२१. उत्तर भारतातील हरयाणा सरकारने अर्थात मनोहर लाल खट्टर सरकारने ‘गोरखधंदा’ शब्दावर निर्बंध लावल्याची बातमी मध्यंतरी कानावर आली आणि मन गोरखधंदा या शब्दाभोवती रूंजी घालू लागले. गोरखधंदा म्हणजे जटील काम, एखादे गुंतागुंतीचे काम. अकराव्या शतकात गुरू गोरक्षनाथ यांनी ‘धंधारी’ नावाचे एक यंत्र बनवले होते. (नाथपंथीय आताही नेहमी या यंत्रासोबत मंत्रपठण करतात.) एक लाकडाची पट्टी एकमेकांत गुंफून चक्राकार बनवायची व मध्ये छिद्र पाडायचे, त्यातून एक धागा टाकून त्याला पुढे कवडी बांधायची. मंत्र पुटपुटत असताना ही कवडी छिद्रातून व्यवस्थित बाहेर काढायची, नाथपंथीयामध्ये आजही असे मानले जाते की ही कवडी ज्याला व्यवस्थित बाहेर काढता आली तर त्यावर गोरक्षनाथांची कृपा आहे. गोरक्षनाथांनी बनवलेले धंधारी यंत्र आणि कवडी काढायच्या या प्रकाराला म्हटले जायचे गोरखधंदा. परंतु कालांतराने जटील असा अर्थ असलेल्या या शब्दाला काळी किनार आली आणि भ्रष्टाचार, काळे व्यवहार याला पर्यायी म्हणून हा शब्द वापरला जाऊ लागला. वस्तुत: हा शब्द अत्यंत सकारात्मक आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया इतका साधा सोपा त्याचा अर्थ आहे, तो पुढे लोकांच्या चुकीच्या वापरामुळे बदनाम झाला. गोरखधंदा हा शब्द पूर्णत: नाथसंप्रदायाशी निगडीत असल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि हरयाणा सरकारने ही गोष्ट ध्यानी घेऊन या शब्दावर निर्बंध घातले.

गोरखधंदा हा शब्द नाथसंप्रदायात वापरला जायचा. रजनीश ओशो यांनी ‘मन मधुकर खेलत वसंत’ या आपल्या पुस्तकात हा शब्द वापरला आहे तसेच जैनेंद्रकुमार यांनीदेखील ‘निबंधो की दुनिया’ या पुस्तकात गोरखधंदा शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मतानुसार गुरू गोरक्षनाथांनी साधनेच्या इतक्या पद्धती शोधल्या होत्या की कोणती पद्धती वापरायची याबाबत साधक भ्रमित होतात व या अवस्थेला गोरखधंदा म्हटले जाते.‘माया का गोरखधंधा, कोई समझ न पाये रे’ असे एक जुने भजनही प्रसिद्ध असून नुसरत फतेह अली खान यांची ‘तुम इक गोरखधंदा हो’ ही कव्वालीदेखील प्रसिद्ध आहे. हे झाले संदर्भ परंतु या शब्दाबरोबर छेडखानी कोणी केली असा प्रश्न विचारला गेला तर इंग्रजांनी असे त्याचे उत्तर आहे. संतांच्या बाबत काही चुकीचे समज पसरून देण्याचा मनसुबा हे इंग्रजांचे सुरूवातीपासूनचे हत्यार होते. त्याचा वापर त्यांनी जेथे करायचा तेथे बरोबर केला. गोरखधंदा शब्दही त्यातून वाचू शकला नाही. धंधारी पासून आले ते धंदा व गोरक्षनाथांपासून आला तो गोरख परंतु येथे धंदा म्हणजे व्यापार या अर्थाने तो घेतला गेला आणि धोका, कपट अशा अर्थाने हा शब्द वापरण्यास सुरूवात झाली. गोरक्षनाथांनी आविष्कृत केलेल्या या शब्दाची आजही यथायोग्य वाट लावली जात आहे.   

 

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

कृष्ण

 कृष्ण

आज कृष्ण जयंती, नाही परंपरेनुसार आज श्रीकृष्ण जयंती पण श्रीकृष्णांपेक्षा कृष्ण जवळचा वाटतो, श्री जोडला की मग ते मोठे होतात व अनायासेच आपल्यातून, माणसातून जाऊन देवत्त्वाकडे झुकतात. झुकतात कसले देवच होतात. कृष्ण म्हटले म्हणजे कसे सखा वाटतो. ही आणखी एक अडचण आहे बरे का. कृष्ण म्हटले की त्याला ललितकडे ओढण्याचा आपल्याकडील लेखकरावांचा प्रयत्न असतो. त्यात राधा येते, मग रासक्रीडा येते, प्रेम येते, आठवणी येतात, भावना येतात आणि त्याला ललितमध्ये कैद करून त्याची मजाच घालवली जाते. मला वाटते मला मांडायचाय तो वेगळा कृष्ण आहे.

कृष्ण हे भगवान विष्णुंच्या नामांपैकी एक नाम. त्याला भगवान विष्णुंचा आठवा अवतारही मानतात. कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव ‘विष्णू सहस्रनामात’ ५७ व्या तर ‘केशव’नामात २४ व्या क्रमांकावर येते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपासचा. कृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सुक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषींचे नावही होते. त्यानुसार इतिहासकाळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. कृष्णाची मातामातामह मारिषा व सावत्र आई रोहिणी या नागकुळातील होत्या. यादवकुळात वसुदेव-देवकी यांच्या पोटी जन्मलेल्या कृष्णाचे गुरू उज्जैनचे सांदीपनी ऋषी होते. शंखासूराच्या मृत्युनंतर त्याच्या शवाजवळील शंख कृष्णाने सांदीपनींना दिला, त्यांनी त्याचे नाव ‘पांचजन्य’ ठेवून तो कृष्णाला परत केला. तसेच सोबत ‘अतितंजय’ नावाचे धनुष्य दिले. त्याच्या खडगाचे नाव नंदक व गदेचे नाव कौमौदकी होते. याशिवाय कृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र भगवान विष्णुंनी उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. तेच पुढे कृष्णावतारात धारण केले व वापरले. कृष्णाकडे मुरलीही होती. पहिली मुरली पालकपिता नंद यांनी (राधेने नव्हे) दिली होती. कृष्णाची ‘नारायणी’ सेना ही अतिविध्वंसक व कलारिपट्टू युद्धात निपुण होती म्हणूनच दुर्योधनाने कृष्णाची निवड न करता नारायणी सेनेची निवड केली होती. कलारिपट्टू पुढे बोधिधर्मन व कालांतराने मार्शल आर्ट म्हणून प्रगत झाली असल्याचे दाखले मिळतात.   

कृष्णाला पारिजातकाचे फूल, राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) अत्यंत आवडीची. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी त्यांची नावे ठेवण्यात आली होती. कृष्णाला उत्तम सारथ्यकला अवगत होती. त्याच्या रथाचे नाव ‘जैत्र’ व सारथ्याचे नाव ‘दारूक’ होते. पुढे महाभारत युद्धात कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. कृष्ण अत्यंत कुशल धनुर्धर होता याचे उत्तम उदाहरण म्हणजे मद्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा (कृष्णाचा मुलगा सांब याच्या पत्नीचे नाव देखील लक्ष्मणाच होते, ती दुर्योधन व भानुमती यांची कन्या होती. येथे गल्लत होऊ शकते म्हणून संदर्भ दिला.) हिला वरण्यासाठी अर्जुन, कर्ण व कृष्ण हे तिघे स्वयंवरात होते परंतु माशाचा वेध एकट्या कृष्णालाच घेता आला. कृष्णाच्या त्वचेचा रंग मेघश्यामल होता आणि त्याच्या अंगप्रत्यंगातून एक विशिष्ट सुगंध नेहमी दरवळत असे, त्याची कोमल त्वचा युद्धात अत्यंत वज्रमय होत असे हिच बाब कर्ण व द्रौपदीच्या बाबतीतही होती. आसाममध्ये बाणासूरासोबत झालेल्या युद्धात भगवान शिव कृष्णाच्या विरोधात उभे ठाकले असता त्यांनी महेश्वर ज्वर अस्त्राचा प्रयोग केला तेव्हा त्याविरोधात वैष्णव ज्वर अस्त्र योजून कृष्णाने जगातले पहिले जिवाणू युद्ध केले असल्याचे उल्लेख शास्त्रात सापडतात.

‘महाभारत’, ‘विष्णुपुराण’, ‘भागवतपुराण’ किंवा ‘हरिवंशपुराण’ यामध्ये राधेचा साधा उल्लेखही नाही. ‘ब्रह्मवैवर्तपुराण’ या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया असल्याचा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. ‘राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. ब्रह्मवैवर्तपुराण आणि गर्ग संहितेमध्ये, कृष्णाने वृंदावनाजवळील भांडीरवन जंगलात भगवान ब्रह्माच्या उपस्थितीत गुप्तपणे राधाशी लग्न केले होते, असा उल्लेखही आला आहे.

कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.

कृष्णाच्या मृत्युची कथा दारूण आहे. जाम्बुवती व कृष्णाचा मुलगा सांब अत्यंत रूपवान परंतु अपरिपक्व. त्याने वसिष्ठ, विश्वामित्रादी ऋषी व नारदमुनी द्वारकेला आले असताना त्याने स्त्रीवेश धारण करून ‘आपण गर्भवती आहोत, काय होईल’ असे विचारले असता हे थोतांड सर्व ऋषींच्या लक्षात आले त्यांनी ‘तुला मुसळ होईल व ते समस्त यदूवंशाचा नाश करील’ असे सांगितले. अर्थात सांबाच्या पोटातून मुसळ वगैरे येणे ही फॅण्टसी होऊ शकेल परंतु मूळ असे आहे की सांबाने एका अतिविशाल अशा मुसळाची निर्मिती केली. ते राजा उग्रसेनाला कळताच त्याने या लोखंडी मुसळाचे चूर्ण बनवून प्रभास नदीच्या तिरावर फेकून दिले. (यादव कुळातील तरूणांच्या भोगी व विलासी वृत्तीला कंटाळून कृष्णाने त्यांना प्रभास नदीच्या काठावर तीर्थयात्रा करण्याचे सुचवले होते परंतु तेथे मद्यधुंद होऊन त्यांनी एकमेकांमध्ये युद्ध केले. तेच यादवी युद्ध, त्यात सर्वजण मृत्यु पावले.) यातील लोखंडाचा काही भाग माशाने गिळला व पुढे हा मासा एका व्याधाच्या हाती लागला. त्याने त्या लोखंडाच्या तुकड्यापासून बाण बनवला व तोच पुढे कृष्णाच्या अंगठ्याला मृगाचे मुख समजून मारला त्यात कृष्णाचा अंत झाला, अशी कथा ऐकवण्यात येते. कृष्ण मानव होता, असेलही तो अतिमानव परंतु तो माणसासारखे जगला व त्याच्यासारखाचा मृत्यु पावला. कृष्णार्पणमस्तू.  

-प्रशांत भरवीरकर




गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

नागांचा आदिमबंध


 नागांचा आदिमबंध

श्री एम यांच्या ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. सत्य हे बऱ्याच वेळा कल्पनेपेक्षा अदभूत असू शकते याची ती प्रचिती. श्री एम यांचे गुरू महेश्वरनाथ बसलेल्या गुहेत आकाशातून एक अग्नीलोळ येतो व त्यातून एक सर्प प्रकट होऊन बाबाजींशी संभाषण करून पुन्हा त्याच मार्गाने निघून जातो. त्यावर महेश्वरनाथ नागलोकाविषयी अनेक गोष्टी सांगतात. आकाशगंगेमध्ये सात ग्रह व अठरा चंद्र असलेली एक सौरमाला असून त्यापैकी एका ग्रहाला सर्पलोक म्हटले जाते. त्या ग्रहावर अत्यंत प्रगत अशी फणा असलेली सर्प जमात वास्तव्य करते. त्या लोकांना नागदेवता असे म्हटले जाते. अनेक पुरातन संस्कृतीमध्ये नागपुजेला जे स्थान दिले आहे ती पूजा म्हणजे प्रगत अशा नागसंस्कृतीला दिलेली एक मानवंदनाच ठरते.
सर्पकुळात अधिष्ठाता। वासुकी गा मी कुंतीसुता। नागांमाजी समस्ता। अनंतु तो मी।।
                                     -ज्ञानेश्वरी अध्याय १० वा  
श्रीकृष्ण भगवदगीतेत सांगतात, सर्पांचा राजा वासुकी मी तर नागांचा राजा अनंत मी यावरून या कुळाचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अरूण ताह्मणकरांचे ‘सर्पंगंध’ नावाचे एक पुस्तक वाचण्यात आले होते. त्यात नागांचे अतिशय सुरस वर्णन केलेले होते. त्यांनी नागांचा व कुंडलिनी शक्तीचा संबंध जोडलेला होता.
नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें। वळण घेऊनि आलें, सेजे जैसें।। २२२
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी, निजैली असे।। २२३
                        -ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा
श्री ज्ञानेश्वर जेव्हा कुंडलिनीचे वर्णन करतात तेव्हा ते नागाचा व सर्पांचा आधार घेतात. यावरूनही त्यांचे महात्म्य आपल्या लक्षात यावे. सर्पकूळ किती आदिम तर रामचरितमानसमध्ये विनता व कद्रुची एक कथा आली आहे, महाभारताच्या आदिपर्वामध्येही ती येते. दक्ष प्र्रजापतीच्या दोन कन्या, विनता व कद्रु यांनी कश्यप ऋषींसोबत विवाह केला. एकदा प्रसन्न होऊन कश्यप ऋषींनी त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा कद्रुने एक हजार पराक्रमी पुत्रांची आई होण्याचे व विनताने दोनच परंतु कद्रुच्या पुत्रांपेक्षा अधिक पराक्रमी ते असावेत असा वर मागितला. त्याप्रमाणे कद्रुला एक हजार पुत्र झाले. तेच सर्प असे मानले जाते. विनताचे मुलगे अरूण(हा सुर्याचा सारथी) व दुसरा गरूड. तर असे हे महापराक्रमी सर्प. गरूडाने अमृतकुंभ आणून ज्या चऱ्यांवर ठेवला तेथे अमृतकण सांडले असतील म्हणून सर्पांनी ते चरे जिभेने चाटण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची जीभ मधोमध कापली गेली व त्या दोन झाल्या असाही एक संदर्भ महाभारतात आहे तर सर्पांचा उल्लेख महादेवपुराणातदेखील आढळतो. मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र्रमंथन केले तेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते सृष्टीला जाळत असताना महादेवाने ते प्र्राशन केले हे त्यात आलेच आहे परंतु समुद्रात जे विष पसरले होते ते पिण्याचे काम या सर्पांनीच केले आणि मानवजगताला अभय प्रदान केले. नागांचा संदर्भ असा आदिम आहे. आपण पुराणकाळापासून देवघरात ज्या नाग-नरसोबाची पूजा करतो तो म्हणजे नागांप्रती कृतज्ञता भावच आहे. नरसोबा म्हणजे नृसिंह महाराज. प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची ती कथा. दुसरी कथा कालियामर्दनाची, तिसरी कथा जिवत्यांची तर चौथी बुध-बृहस्पतीच्या युद्धाची. या कथा आपल्याला काय सांगतात? केवळ कृष्णाने कालियामर्दन केले, अथवा जिवत्यांनी बाळांना मांडीवर घेऊन जोजावले इतकेच का? नाही नाग-नरसोबाच्या पुजनातून आपण हा बोध घेतला पाहीजे की आपली संस्कृती ही आदिम आहे. तिचा आपण अभिमान बाळगला पाहीजे. एका स्त्रीच्या पोटी सर्प कसे आले, तिने एक हजार अंडे कसे दिले, त्यातून सर्पच कसे बाहेर आले, त्यांनी उच्चैश्रवा घोड्याच्या शेपटीला स्वत:ला बांधून घेऊन आई, कद्रुला विजय कसा मिळवून दिला, विनता कशी तिची दासी झाली, सर्पांच्या दोन जिव्हा कशा झाल्या, त्यांनी विष कसे पचवले यातील चमत्कारांचा भाग आपण सोडून देऊ थोडावेळ परंतु पुराणकाळापासून नागजमात ही मानवाची मदत करत आली आहे, ती अगदी शेतातील उंदीर नष्ट करण्याच्या रूपाने असो किंवा आजच्या मॉडर्न सायन्समधील अनेक औषधे हे सर्पांच्या लाळेपासून अथवा विषापासून बनवण्यात आले आहेत येथपर्यंत असो. या आदिम जमातीने मानवासाठी मैत्रीचा हात नेहमी पुढे केला आहे. मुळात महाभारतात तर त्यांना मानवाचाच नव्हे त्यांच्यापेक्षा प्रगत असल्याचा दर्जा दिला आहे. काही शास्त्रांमध्ये असेही येते की जेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांनी आपल्यासमोरचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपले पितर नागाच्या माध्यमातून येऊन ते प्रश्न सोडवतात. यातीलही अतिशयोक्ती किंवा फॅण्टसीचा भाग आपण सोडून देऊ, त्यांचे दर्शन म्हणजे मानवजातीसाठी एक आश्वासकता घेऊन येते एवढे जरी यातून आपण घेतले तरी सार्थक.
©️प्रशांत भरवीरकर

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचानाशिकमध्ये येणारा...




गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचा
नाशिकमध्ये येणारा...
: गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचा नाशिकमध्ये येणारा प्रत्येकजण गोदेचा आशीर्वाद घेऊन रविवार कारंजावर प्रवेश करतो...नाशिकमध्ये येतो...खूप...

एनर्जी 


 एनर्जी 
मानवी देहामध्ये शक्तीचे सातपुंजके असतात, क...: एनर्जी  मानवी देहामध्ये शक्तीचे सात पुंजके असतात, कुणी त्याला कुंडलिनी म्हणते, कुणी आणखी काही. या शक्तीपुंजक्याला सकारात्मक ऊर्जा देणारी ...

कृष्णपिसे गहिरे...!



कृष्णपिसे गहिरे...!संदीपची नायिका कधी वादळ कधीशां...
: कृष्णपिसे गहिरे...! संदीपची नायिका कधी वादळ कधी शांत वारा. पावलांच्या ठशाठशामध्ये तिने कितीतरी मनोरम्य आठवणी साचवून ठेवलेल्या असतील. आत...

सोमवार, १८ मार्च, २०१९

उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!


उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!

महाराष्ट्र हा उत्सवप्रिय लोकांचा देश आहे. सण कोणताही असो त्याचे उत्सवी स्वरूप येथील कलारसिक माणसांना आनंद देते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीन उत्सव यापैकीच. उन्हाळ्याच्या सुरूवातीला येणारे हे तीन उत्सव गेल्या काही वर्षांपासून मात्र गोंधळाच्या वातावरणातच पार पडताना दिसत आहेत. असे असले तरीही नाशिककर मात्र अद्यापही परंपरा राखून आहेत. हे तीनही उत्सव त्या त्या पध्दतीने साजरे करण्यातच त्यांना आनंद वाटतो. होळीला गोवऱ्या, लाकडांची रास रचत अमंगलाच्या नष्टतेचा आनंद साजरा केला जातो. धुळवडीला राख फासत पारंपरिकतेला सलाम केला जातो तसेच रंगपंचमीला रहाडींमधून रंग खेळला जातो.
_________
समभाव ही भावना एकमेकांच्या उत्कर्षासाठी असते परंतु त्यामुळे काही बाबींचा ऱ्हासही होतो. एखाद्या भागात अनेक ठिकाणांहून आलेले लोक रहात असतील तर त्यांचे उत्सव एकमेकांवर अतिक्रमण करतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे होळी. नामसाधर्म्यामुळे होळी सणाला आता बऱ्याच अंशी ‘होली’चे स्वरूप येत चालले आहे किंबहुना होळी ही पुरती ‘होली’ बनून गेली आहे. सध्या तरी आजुबाजूला तसेच चित्र पहावयास मिळते. नाशिक मात्र उत्सवांच्या बाबतीत अद्यापही सहीसलामत आहे. येथील रहाडी, दाजिबा वीर, वीरांची मिरवणूक, होळीचा माहोल याला एक वेगळीच चमक आहे.
पारंपरिक उत्सवांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याने पूर्वापार चालत आलेल्या अनेक रूढी परंपरांशी उत्सवांची फारकत होऊ लागली आहे. तसे पाहता होळी, धुळवड (धुलीवंदन) व रंगपंचमी हे तीन वेगवेगळे उत्सव आहेत. होळी म्हणजे अमंगलाचा नाश, धुळवड म्हणजे तीव्र उन सहन करण्याची शक्ती देणारा दिवस आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. परंतु दरम्यानच्या काळात झाले काय की अनेक संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहू लागले व त्यांचे सण समारंभ त्यांच्या पध्दतीने साजरे करू लागले. उत्तरभागातून आलेले अनेक लोक त्यांच्या ‘होली’ची तुलना आपल्या होळीशी करू लागले व होळीच्या दिवशीच होली म्हणजे त्यांची रंगपंचमी साजरी करू लागले. याला आधार मिळाला तो होळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या आपल्या धुळवडीमुळे. आदल्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख धुळवडीच्या दिवशी अंगाला फासण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. राख फासल्याने कमीपणा येतो म्हणून आणि उत्तरेकडील लोक यादिवशी त्यांची ‘होली’ खेळत असल्याकारणाने धुळवडीला रंग खेळण्याची परंपरा जोर धरू लागली. आजही अनेक भागात धुळवडीच्याच दिवशी ‘होली है’ म्हणत मराठी बांधव रंग खेळू लागले. म्हणजेच नामसाधर्म्यामुळे होळीच्या दिवशीच होली (रंगपंचमी) साजरी करण्याचा प्रघात पडला. याचा प्रतिकूल परिणाम असा झाला की येथील लोक होळी खेळली का? होळी है, अशा ललकाऱ्या देऊ लागले. होळी व ‘होली’चा काला होऊन रंगपंचमीपर्यंत चार-पाच दिवस रंगांचा हा उत्सव खेळला जाऊ लागला.
मूळात होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. लाकडांची रास करून ती जाळतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. या उत्सवाला ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यामागे काही धार्मिक कथाही आहेत. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळात उडी मारणारी होलिका ईश्वराच्या सामर्थ्यामुळे जळून खाक झाली ही ती कथा व त्या होलिका शब्दाचा झालेला अपभ्रंश म्हणा किंवा उच्चारामुळे झालेला बदल म्हणा ‘होळी’ असा शब्द निर्माण झाला असावा असा तर्क बांधण्यात येतो. खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला का लावायची तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा आपण सहन करू शकू यासाठी. त्याला आपल्याकडे धुळवड संबोधण्यात येते. हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. मग या दिवशी रंगच का खेळू नये या वृत्तीतून रंगांच्या उत्सवावर अतिक्रमण झाले. धुळवडीलाही रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. रंगपंचमी हा तर रंगांचाच उत्सव तो होळीनंतर लगेचच दोन-चार दिवसांनी येतो.  त्यादिवशी एकमेकांच्या अंगाला रंग लावून खेळाचा आनंद घेतला जातो. अंगाला रंग लावण्यामागे अशी भावना आहे की जितका जास्त रंग खेळाल तितके ऊन कमी लागते. त्यातूनच मग पाण्याचा कमी वापर करावा, इको फ्रेण्डली रंगपंचमी साजरी करावी, नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्यावे वगैरे बाबी प्रामुख्याने आल्या. परंतु सर्वात जास्त गोंधळ झाला तो होळी, धुळवड आणि रंगपंचमी या तिघा उत्सवांची सरमिसळ झाल्याने. गेल्या काही वर्षांपासून बेमालूमपणे हे झाल्याने उत्सवांच्या या अतिक्रमणांचे वाटावे तेवढे वाईट हे थोडेच आहे.
‘होळी’ या एका शब्दापाशी हे उत्सव येऊन खिळले आहेत का याचा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. होळी शब्दाशी जवळीक साधणारा ‘होली’ हा शब्द असल्याने असे झालेय का हे ही तपासून पाहताना मूळ होळी संकल्पनेपासून आपण दूर तर जात नाही ना याकडे गांभीर्याने पाहण्याचीही वेळ आलेली आहे.



शनिवार, २६ मे, २०१८

गोदातरंग


गोदातरंग 
परवा एका कार्यक्रमानिमित्ताने गोदाकाठी जाणं झालं. कधीही गेलं तरी गोदा प्रसन्नच असणार यात नवल नाही. सायंकाळची वेळ होती, ही कातरवेळ मोठी मगेशीर असते. यावेळी नाही नाही ते आठवतं. अशाच आठवणींचा पुंजका समोर घेऊन बसलेलं असताना घरात गांजलेल्या दोन मायलेकी आल्या. दोघीही एकमेकींची खुप काळजी घेत होत्या. पायऱ्यांवर बसल्या. ‘हळूच आई’ म्हणत लेकीने तिला हात दिला. आईला व्यवस्थित बसवून दिलं. एका पायरीवर ती मुलगी बसली. घरात काय चालतं यावर दोघींचं गंभीर बोलणं चाललं होतं, थोडा त्रागा असल्याने ते कानी पडत होतं. बाबांनी समजावून घ्यायला पाहिजे, त्यांनी असं नको वागायला वगैरे. आई मुलीची समजूत घालत होती मुलगी आईच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होती. ‘किती काळजीनं करतेस तू साऱ्यांचं’. ‘माझं जाऊ दे, तू सांग’ असा त्यांचा संवाद रंगात येत असतानाच गोदा जीवाचे कान करून ऐकत होती. तिलाही माहेरवाशिन पोरगी काठावर येऊन दु:ख सांगत असल्यानं ती सुखावली असणारच. एकमेकींचे अश्रु पुसत असतानाच मुलीने विणलेल्या जुन्या पिशवीतून एक स्टीलचा डबा काढला. त्यातून तिने चक्क भजी काढली. एकमेकींचे सुखदु:ख सांगताना आपण घरून बनवून आणलेलं काही खायला पाहिजे, ते ही गोदाघाटी आणून खायला पाहिजे ही भावना ‌किती छान आहे. त्या दोघांचं फार कौतुक वाटलं. त्या रडत होत्या, एकिकडे खाणंही सुरू होतं. थोऽऽऽडं नजरेसमोर आणा...सूर्य बुडालाय. गोदा पिवळसर केशरी प्रकाशात न्हाऊन निघालीय, वटवाघळांचे थवेच्या थवे देवमामलेदार मंदिराहून उडताहेत. मंदिरांमध्ये घंटांचे नाद होताहेत, आरत्या सुरू आहेत. एकिकडे कुणाचा स्नानसंध्या करण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे गोदेला दिवे वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या वातावरणात मायलेकींचा हा खाणसंवाद सुरू आहे. जरा चक्कर टाकण्याचं मन झाल्याने रामकुंडाकडे प्रयाण केलं तर जागोजागी कुटुंबच्या कुटुंब बसलेली. कुठे भत्ता खाण्याचं काम सुरू, कुठं पाणीपुरी तर कुठं घरून आणलेलं जेवण. गोदावरी ही आम्हाला लाभलेली देणगीच आहे. ती कुणाची नाही. तिच्या आश्रयाला आख्खा भारत येऊन राहतो. कधी नाशिकला येणं झालं तर सायंकाळी येथे एक फेरफटका मारायलाच हवा. सराफ बाजारातून जेव्हा आपण गोदेवर प्रवेश करतो तेव्हा क्षणात अलौकीक काहीतरी वाटून जातं. ती मंदिरं, ती छोटी समाधीस्थळं, ती साधुंची वस्ती, ती स्वयंपाकाची जागा. काय नाही गोदेवर. संसारच्या संसार उभे आहेत. गाडगेबाबा पुलावरून उजव्या बाजुला आध्यात्मिकतेचा हा पसारा तर डाव्या बाजुला प्रापंचिक माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दिसतील. शेण्या विकणारे. वाळू विकणारे, माती विकणारे या बाजुला असतात. गाड्या धुण्याचा कार्यक्रम येथेच चालतो. उजवी बाजु सुक्ष्मतेकडे नेणारी तर डावी बाजु जडत्त्वाकडे नेणारी. पण काहीही म्हणा गोदावरी प्रचंड आहे. तिच्या वळचणीला खुपजण आहेत. त्यांना तगायचंय म्हणून आहेत, त्यांना गब्बर व्हायचंय म्हणून आहेत. नीळकंठेश्वराचं मंदिराकडे आपण जातो तेव्हा तेथे भल्या संध्याकाळीही जोतिषांची पंगत बसलेली असते. लोक म्हणतात, त्यांना भविष्य कळतं तर ते तिथं का बसले असते. पण बघा, जेव्हा एखादा गांजलेला तरूण त्यांच्याकडे जाऊन हात पुढे करतो तेव्हा हा त्यांच्यासाठी देवाहून कमी नसतो. त्यांच्याच शेजारी मुळ्याजाळ्या विकणारेही असतात. हे मुळं नक्की काय असतात कुणाला ठाऊक. श्रध्दा अंधश्रध्दा या वादात पडायचं नाही. परंतु त्यांच्या सांगण्याला काही तरी अर्थ असेलच ना. असो तर गोदा सर्वांनाच शरण देणारी आहे.
आता या मायलेकींचं खाणं संपत आलंय. त्यांच्या गप्पाही थांबलेल्या आहेत त्या दोघी शांत आहेत. केवळ पाण्याचा खळखळाट अनुभवताय. त्यांना आता एकमेकींशी काही बोलायचं नाही. गोदेत पडणारी वर्तुळ पाहण्यात त्या मग्न आहेत. पोरासोरांचं खाणंही संपलंय. त्यांनी कागदाची होडी बनवून गोदेत सोडलीय. ती ही खुश आहे. तिला प्रदुषणाची चिंता नाही हो! तिला तो पोरखेळही वाटत नाही तिला त्यांच्या भावना जपायच्याय अन् ती त्याच्याकडेच लक्ष देतेय. गोदा आता शांत आहे. दुरवरून सूर येताहेत...अरेच्चा हे तर जगजीतचे सूर आहेत. ‘ये दौलत भी ले लो...ये शोहरत भी ले लो’

रविवार, २६ मार्च, २०१७

नाथपंथी माधवनाथ महाराज





अवलियांचे जनस्थान : प्रशांत भरवीरकर
----
नाथपंथी माधवनाथ महाराज
वयाच्या दहाव्या वर्षी शैली, शृंगी, कौपिन धारण करणारे, माधवनाथ महाराज नावाचे मोठे अवलिया जनस्थानी होऊन गेले. माधवनाथ महाराजांचे आयुष्य अनेक चमत्कारांनी भरलेले आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. परमहंस माधवनाथ महाराज, शिर्डीचे साईबाबा, पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज व नाशिकचे गोपालदास महाराज यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांचे सूत्र एकमेकांच्या अंत: शक्तीने चालत, असे मानले जाते.
----
नाशिकचे नरसिंग उर्फ गोपालदास महाराज ज्यांना आपले वडील बंधू म्हणून पुकारत ते माधवनाथ महाराज मूळात नाथपंथी होते. त्यांच्याकडे नाथपंथाची चित्रकुटची गादी होती. ‘अवलियांचे जनस्थान’ या शृंखलेत यापूर्वी माधवनाथ महाराजांचा उल्लेख आलेला आहे. ते सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावचे. नाशिकला गोदातिरावर त्यांचा वास होता. येथे अनेक मुमुक्षुंना ज्ञान देऊन त्यांनी सज्ञान केले. गोदातिरी ते गंगागिरी महाराजांच्या सान्निध्यात रहात. माधवनाथ महाराज अज्ञातवासात असल्याने त्यांनी आपले खरे स्वरूप अनेक दिवस प्रकट केले नाही. ते गोदातिरी आपल्याच मस्तीत रहात. कालांतराने त्यांना अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळाले तेव्हा त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला आणि एका अवलियाचे दर्शन जनस्थानवासियांना झाले.
अज्ञातवास संपविल्यावर माधवनाथ महाराज काळाराम मंदिराच्या पूर्व द्वारावर अखंड धूनी पेटवून राहणाऱ्या गोपालदास महाराजांच्या भेटीला गेले. गोपालदास महाराज मौनी म्हणून प्रसिध्द होते, आता हे दोघे साधू एकमेकांशी कसे बोलतात हे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमली तर माधवनाथ महाराजांना पहातच गोपालदास मांडी थोपटू लागले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून माधवनाथ महाराजांनीही मांडी थोपटली. दोघांनाही शड्डू ठोकले, एकमेकांना वाकुल्या दाखवल्या आणि परस्परविरूध्द दिशांना निघून गेले. या पंचायतनाचे सूत्र अंत:शक्तीने चालत हा अनुभव भक्तांना पुन्हा एकदा आला. एकदा तर रामनवमीच्या दिवशी माधवनाथ महाराज गोपालदासांना भेटावयास गेले असता त्यांना कडेवरच उचलून घेतले. नाथांनी त्यांच्या हृदयास आपला कान लावला. संभाषण काहीच नाही. असे हे सूत्र होते.
माधवनाथ महाराज लहान असताना त्यांच्या आई मथुरादेवी त्यांना घेऊन साधू देवमामलेदार यांच्या भेटीला आल्या तेव्हा देवमालेदारांनी त्यांना दुरूनच येताना पाहून ‘हा तर गादीचा मालक माझ्या घरी चालून आला आहे.’ असे उदगार काढले. मथुरादेवींनी देवमामलेदारांना वंदन केले, त्यांनी लहानग्या माधवला उचलून घेतले आणि ‘बाळाचे रक्षण करावे, हा उज्जैयनीचा प्रसाद आहे,’ असे सांगितले त्यावर आई मथुरादेवी यांना माधवच्या जन्माची आठवण झाली.
किशोरवयीन अवस्थेत त्यांचे वास्तव्य अवंती नगरीत होते, तेथे त्या महाकाळाची पूजा करीत. एकदा श्रावणी सोमवारी त्या महाकाळाची पूजा करून ध्यानस्थ बसल्या असता जटाधारी, अंग भस्मांकित, कासे लंगोटी व तेजोवलयांकित असा पुरूष तेथे आला आणि शिवशंकराची पिंड पुजनास देत ‘तू चतुर्सिध्द माता होशील’ असा आशीर्वाद देऊन चालता झाला. पुढे विवाहानंतर गर्भवती असताना त्या चित्रकुट येथे बंधुंच्या भेटीला गेल्या असता, त्यांचे बंधू विठ्ठलनाथ यांनी त्यांना काही दिवस तेथेच ठेवून घेतले. विठ्ठलनाथ हे महायोगी होते. केवळ दुर्वांचा रस प्राशन करून त्यांनी तपाचरण केले होते. त्यांच्या मठाखाली एक मोठी गुंफा होती. तेथे आदिनाथांची समाधी असून नाथांचे ते मूळस्थान म्हणून प्रसिध्द आहे. नाथांचे मोठे मंदिर स्थापन करून विठ्ठलनाथ येथे रहात असत. मथुरादेवी अशा पावन ठिकाणी असताना दिवसभर पूजेत मग्न रहात असत. तो दिवस होता, शके १७७९. चैत्र शुध्द प्रतिपदा. २६ मार्च १८५७. सूर्योदयाच्या समयी व्यंकटेश बालाजीस प्रदक्षिणा घालत असताना त्यांना प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, मोठ्या आनंदाने विठ्ठलनाथांनी त्याचे नाव माधव ठेवले.
क्षणार्धात मथुरादेवींना हा काळ डोळ्यासमोर झळकला. देवमामलेदारांनी आठवण करून देताच मथुरादेवींना हा देवाचा प्रसाद असल्याचे जाणवले. पुढे देवमामलेदारांनी सांगितले की आता पुन्हा चित्रकुटाचे बोलावणे येणार आहे, तेव्हा तेथे जाऊन जे काही मिळेल त्याचा स्वीकार करावा. पांगरीला परतल्यावर लगेचच माधव यांना चित्रकुटाचे बोलावणे आले. विठ्ठलनाथांची गादी रिकामी झाली असल्याने तेथे कुणास बसवावे अशा विचारात सर्वजण असताना चिठ्ठया टाकण्यात आल्या आणि त्यात लहानग्या माधवचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना तातडीने चित्रकुटास बोलाविण्यात आले होते. अशाप्रकारे वयाच्या केवळ दहाव्या वर्षी माधवचे माधवनाथ महाराज झाले. पुढे माधवनाथ महाराज चित्रकुटला शैली, शृंगी, कौपिन धारण करून नाथवेषात सदैव आपल्याच मस्तीत रहात. भोजनाची शुध्द नाही, कधी उपवास तर कधी दुग्धपान करीत. ते नाथपंथी असूनही त्यांच्या गळ्यात कायम तुळशीची माळ असे. पुढे माधवनाथांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांच्या विवाहाचा धोशा लावला मात्र माधवनाथ महाराजांना विवाह पसंत नसल्याने त्यांनी स्थानत्याग केला आणि भारत दर्शनासाठी निघाले. नाथांची सर्व ठिकाणे फिरल्यावर बारा वर्षांनी ते येऊन पुन्हा चित्रकुटास आले. मात्र तेथे चमत्कार करण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांना अज्ञातवासात राहण्याचा आदेश केला. त्यानुसार माधवनाथ महाराज कासे लंगोटी लावून निघाले. पुढे ते पिशाच्चवृत्ती धारण करून फिरत राहिले. इंदूरहून महूस, तेथून धारानगरीस, खांडव्यास, तेथून चाळीसगावास आले. पोहेरगावी असताना रंभा पाटील यांच्याकडे धोंड्या नावाने राहू लागले. तेथे ते शेताची राखण करीत. मात्र एकदा हरिभजनात मग्न असताना एका मस्तवाल बैलाने शेताची नासधूस करून टाकली. पाटलीन बार्इंनी त्यांना भलेबुरे ऐकवले तेव्हा ‘५२ मण गहू पिकतील’ असे सांगून गावाबाहेर जाऊन राहिले. त्याप्रमाणे तितके गहू पिकताच पाटील त्यांना घ्यायला परत आले, मात्र ते गेले नाही. पुढे येसगाव नावाच्या खेडगावी ते राहिले. तेथे ते लहान मुलांना शिकविण्याचे काम करीत. तेथे त्यांच्या विवाहाचा विचार गावकऱ्यांनी केल्याने तेथून निघून ते रोझे गावी आले. येथे जर्जरी जरबंक्ष नावाचे नाथांचे ठिकाण आहे. येथे भिकनशावली नावाचे एक फकीर रहात त्यांना भेटताच माधवनाथ महाराजांना अंतरीची खूण पटली आणि त्यांनी भिकनशावली यांना कडकडून मिठी मारली. तेथून ते पांगरीला आले. पांगरीला काही दिवस मुक्काम करून लासूर गावी गेले. येथे गंगागीर महाराज म्हणून मोठे हरिभक्त होते. लाक्षायणी देवीच्या मंदिरात भजन सुरू असताना गंगागीर महाराज माधवनाथ महाराजांच्या पायी लागत ‘हा दिव्य सत्पुरूष आहे’ असे सांगू लागले मात्र माधवनाथ महाराजांनी त्यांना अज्ञातवासाच्या व्रताची आठवण करून दिली.
काही दिवसांनी माधवनाथ महाराज सप्तशृंग गडावर आले. येथेही त्यांनी अनेक चमत्कार केले. दोन महिने गडावर वास्तव्य केल्यावर नाशिकला गोदातिरी आले आणि अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळताच लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला. नाशिकला असताना सार्वजनिक सुखप्राप्तीसाठी त्यांनी विद्वानांकरवी सप्तशती ग्रंथाचे पाठ करून सात दिवस यज्ञ केला. पुर्णाहूतीच्या दिवशी नाथांनी तुपाची धार यज्ञकुंडात धरली असता त्यातून मोठ्या ज्वाळा प्रकटून गगनाला भिडलेल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. याच यज्ञात त्यांनी साडी चोळी अपर्ण केली, यज्ञ संपल्यावर ती न जळता तशीच्या तशी निघाल्याची आख्यायिका आहे. नाशिकला त्यांचा हरिसिंग नावाचा मोठा भक्त होता. त्याच्या घरी ते बसत, तेथे मुमुक्षु त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येत असत. एकदा सुकेणेकर जहागिरदार नाथांच्या भेटीस आले, घरी चोरी झाल्याचे वृत्त त्यांना सांगितले तेव्हा एकवीस दिवसात चोर स्वत: घरी येईल. असे सांगून माधवनाथ महाराजांनी समाधी लावली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दागिने चोरांनी स्वत:हून आणून दिले. याच हरिसिंगांच्या घरी एकदा एकादशीच्या दिवशी महाराज कीर्तन करीत असताना काळ्या वर्णाची ठेंगणी मूर्ती असलेला एक तापसी त्यांच्याजवळ येऊन बसला. नाथांनी खुणेनेच हरिसिंगाच्या मुलाला दर्शन घेण्यासाठी सांगितले तर क्षणार्धात मूर्ती अंतर्धान पावली. (असा उल्लेख माधवनाथ महाराजांच्या पोथीत आहे.) प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर माधवनाथ महाराजांना पळसे गावाहून आमंत्रण आले. तेथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तो काळ होता १९०१. या नामसप्ताहात पळसे गावाला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. दहा हजाराहून अधिक भजनी मंडळी स्वत:हून तेथे आली. माधवनाथ सतत नामस्मरणात राहिले. सतत अन्नदान सुरू होते. येथे दर्शनार्थी इतके झाले की नाथांचे पाय सुजून गेले. शेवटी भक्तांनी त्यांना एका मोठ्या झाडावर उच्च आसन करून तेथे बसवले व दर्शनार्थींना दुरून दर्शन घेण्याची विनंती केली, अशी आठवण सांगितली जाते. या ठिकाणी त्यांनी जानोरी (ता. दिंडोरी) येथील त्यांचा शिष्य काशिनाथ शिंपी यास योगक्रिया शिकवली. त्यानंतर अनेक दिवसांनी ते पांगरीस आले. तेथे एका उकीरड्यावर बसून ध्यानावस्थेत गेले व जमलेल्या लोकांना म्हणाले. चित्रकुट येथील व्यंकटेशाचे प्रतिमंदिर येथे व्हावे, असे वाटते. मग काय लोक कामाला लागले. पांगरीस असलेले श्रीविष्णुचे मंदिर ही चित्रकुटची प्रतिकृती आहे. तेथून माधवनाथ महाराज पुण्यास गेले. त्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले असता भगूर येथील भिकूशेठ या गृहस्थाला सज्ञान केले.
माधवनाथ महाराज खऱ्या अर्थाने लोकनायक होते. लोकांचे दु:ख, पीडा त्यांनी दूर केल्या. एकनाथ षष्ठी, १४ मार्च १९३६ रोजी हिंगणघाट (जि.वर्धा) येथे त्यांनी देह ठेवला. त्यांच्या आज्ञेनुसार इंदूरला त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. अशा या माधवनाथ महाराजांची प्रतिमा नारोशंकर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या नरसिंग महाराजांच्या समाधी मंदिरात लावण्यात आली आहे. या पंचायतनाची भक्त मनोभावे पूजा करतात.
________                

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...