प्रशांत भरवीरकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रशांत भरवीरकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

कृष्ण

 कृष्ण

आज कृष्ण जयंती, नाही परंपरेनुसार आज श्रीकृष्ण जयंती पण श्रीकृष्णांपेक्षा कृष्ण जवळचा वाटतो, श्री जोडला की मग ते मोठे होतात व अनायासेच आपल्यातून, माणसातून जाऊन देवत्त्वाकडे झुकतात. झुकतात कसले देवच होतात. कृष्ण म्हटले म्हणजे कसे सखा वाटतो. ही आणखी एक अडचण आहे बरे का. कृष्ण म्हटले की त्याला ललितकडे ओढण्याचा आपल्याकडील लेखकरावांचा प्रयत्न असतो. त्यात राधा येते, मग रासक्रीडा येते, प्रेम येते, आठवणी येतात, भावना येतात आणि त्याला ललितमध्ये कैद करून त्याची मजाच घालवली जाते. मला वाटते मला मांडायचाय तो वेगळा कृष्ण आहे.

कृष्ण हे भगवान विष्णुंच्या नामांपैकी एक नाम. त्याला भगवान विष्णुंचा आठवा अवतारही मानतात. कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव ‘विष्णू सहस्रनामात’ ५७ व्या तर ‘केशव’नामात २४ व्या क्रमांकावर येते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपासचा. कृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सुक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषींचे नावही होते. त्यानुसार इतिहासकाळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. कृष्णाची मातामातामह मारिषा व सावत्र आई रोहिणी या नागकुळातील होत्या. यादवकुळात वसुदेव-देवकी यांच्या पोटी जन्मलेल्या कृष्णाचे गुरू उज्जैनचे सांदीपनी ऋषी होते. शंखासूराच्या मृत्युनंतर त्याच्या शवाजवळील शंख कृष्णाने सांदीपनींना दिला, त्यांनी त्याचे नाव ‘पांचजन्य’ ठेवून तो कृष्णाला परत केला. तसेच सोबत ‘अतितंजय’ नावाचे धनुष्य दिले. त्याच्या खडगाचे नाव नंदक व गदेचे नाव कौमौदकी होते. याशिवाय कृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र भगवान विष्णुंनी उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. तेच पुढे कृष्णावतारात धारण केले व वापरले. कृष्णाकडे मुरलीही होती. पहिली मुरली पालकपिता नंद यांनी (राधेने नव्हे) दिली होती. कृष्णाची ‘नारायणी’ सेना ही अतिविध्वंसक व कलारिपट्टू युद्धात निपुण होती म्हणूनच दुर्योधनाने कृष्णाची निवड न करता नारायणी सेनेची निवड केली होती. कलारिपट्टू पुढे बोधिधर्मन व कालांतराने मार्शल आर्ट म्हणून प्रगत झाली असल्याचे दाखले मिळतात.   

कृष्णाला पारिजातकाचे फूल, राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) अत्यंत आवडीची. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी त्यांची नावे ठेवण्यात आली होती. कृष्णाला उत्तम सारथ्यकला अवगत होती. त्याच्या रथाचे नाव ‘जैत्र’ व सारथ्याचे नाव ‘दारूक’ होते. पुढे महाभारत युद्धात कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. कृष्ण अत्यंत कुशल धनुर्धर होता याचे उत्तम उदाहरण म्हणजे मद्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा (कृष्णाचा मुलगा सांब याच्या पत्नीचे नाव देखील लक्ष्मणाच होते, ती दुर्योधन व भानुमती यांची कन्या होती. येथे गल्लत होऊ शकते म्हणून संदर्भ दिला.) हिला वरण्यासाठी अर्जुन, कर्ण व कृष्ण हे तिघे स्वयंवरात होते परंतु माशाचा वेध एकट्या कृष्णालाच घेता आला. कृष्णाच्या त्वचेचा रंग मेघश्यामल होता आणि त्याच्या अंगप्रत्यंगातून एक विशिष्ट सुगंध नेहमी दरवळत असे, त्याची कोमल त्वचा युद्धात अत्यंत वज्रमय होत असे हिच बाब कर्ण व द्रौपदीच्या बाबतीतही होती. आसाममध्ये बाणासूरासोबत झालेल्या युद्धात भगवान शिव कृष्णाच्या विरोधात उभे ठाकले असता त्यांनी महेश्वर ज्वर अस्त्राचा प्रयोग केला तेव्हा त्याविरोधात वैष्णव ज्वर अस्त्र योजून कृष्णाने जगातले पहिले जिवाणू युद्ध केले असल्याचे उल्लेख शास्त्रात सापडतात.

‘महाभारत’, ‘विष्णुपुराण’, ‘भागवतपुराण’ किंवा ‘हरिवंशपुराण’ यामध्ये राधेचा साधा उल्लेखही नाही. ‘ब्रह्मवैवर्तपुराण’ या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया असल्याचा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. ‘राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. ब्रह्मवैवर्तपुराण आणि गर्ग संहितेमध्ये, कृष्णाने वृंदावनाजवळील भांडीरवन जंगलात भगवान ब्रह्माच्या उपस्थितीत गुप्तपणे राधाशी लग्न केले होते, असा उल्लेखही आला आहे.

कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.

कृष्णाच्या मृत्युची कथा दारूण आहे. जाम्बुवती व कृष्णाचा मुलगा सांब अत्यंत रूपवान परंतु अपरिपक्व. त्याने वसिष्ठ, विश्वामित्रादी ऋषी व नारदमुनी द्वारकेला आले असताना त्याने स्त्रीवेश धारण करून ‘आपण गर्भवती आहोत, काय होईल’ असे विचारले असता हे थोतांड सर्व ऋषींच्या लक्षात आले त्यांनी ‘तुला मुसळ होईल व ते समस्त यदूवंशाचा नाश करील’ असे सांगितले. अर्थात सांबाच्या पोटातून मुसळ वगैरे येणे ही फॅण्टसी होऊ शकेल परंतु मूळ असे आहे की सांबाने एका अतिविशाल अशा मुसळाची निर्मिती केली. ते राजा उग्रसेनाला कळताच त्याने या लोखंडी मुसळाचे चूर्ण बनवून प्रभास नदीच्या तिरावर फेकून दिले. (यादव कुळातील तरूणांच्या भोगी व विलासी वृत्तीला कंटाळून कृष्णाने त्यांना प्रभास नदीच्या काठावर तीर्थयात्रा करण्याचे सुचवले होते परंतु तेथे मद्यधुंद होऊन त्यांनी एकमेकांमध्ये युद्ध केले. तेच यादवी युद्ध, त्यात सर्वजण मृत्यु पावले.) यातील लोखंडाचा काही भाग माशाने गिळला व पुढे हा मासा एका व्याधाच्या हाती लागला. त्याने त्या लोखंडाच्या तुकड्यापासून बाण बनवला व तोच पुढे कृष्णाच्या अंगठ्याला मृगाचे मुख समजून मारला त्यात कृष्णाचा अंत झाला, अशी कथा ऐकवण्यात येते. कृष्ण मानव होता, असेलही तो अतिमानव परंतु तो माणसासारखे जगला व त्याच्यासारखाचा मृत्यु पावला. कृष्णार्पणमस्तू.  

-प्रशांत भरवीरकर




गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

नागांचा आदिमबंध


 नागांचा आदिमबंध

श्री एम यांच्या ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. सत्य हे बऱ्याच वेळा कल्पनेपेक्षा अदभूत असू शकते याची ती प्रचिती. श्री एम यांचे गुरू महेश्वरनाथ बसलेल्या गुहेत आकाशातून एक अग्नीलोळ येतो व त्यातून एक सर्प प्रकट होऊन बाबाजींशी संभाषण करून पुन्हा त्याच मार्गाने निघून जातो. त्यावर महेश्वरनाथ नागलोकाविषयी अनेक गोष्टी सांगतात. आकाशगंगेमध्ये सात ग्रह व अठरा चंद्र असलेली एक सौरमाला असून त्यापैकी एका ग्रहाला सर्पलोक म्हटले जाते. त्या ग्रहावर अत्यंत प्रगत अशी फणा असलेली सर्प जमात वास्तव्य करते. त्या लोकांना नागदेवता असे म्हटले जाते. अनेक पुरातन संस्कृतीमध्ये नागपुजेला जे स्थान दिले आहे ती पूजा म्हणजे प्रगत अशा नागसंस्कृतीला दिलेली एक मानवंदनाच ठरते.
सर्पकुळात अधिष्ठाता। वासुकी गा मी कुंतीसुता। नागांमाजी समस्ता। अनंतु तो मी।।
                                     -ज्ञानेश्वरी अध्याय १० वा  
श्रीकृष्ण भगवदगीतेत सांगतात, सर्पांचा राजा वासुकी मी तर नागांचा राजा अनंत मी यावरून या कुळाचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अरूण ताह्मणकरांचे ‘सर्पंगंध’ नावाचे एक पुस्तक वाचण्यात आले होते. त्यात नागांचे अतिशय सुरस वर्णन केलेले होते. त्यांनी नागांचा व कुंडलिनी शक्तीचा संबंध जोडलेला होता.
नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें। वळण घेऊनि आलें, सेजे जैसें।। २२२
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी, निजैली असे।। २२३
                        -ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा
श्री ज्ञानेश्वर जेव्हा कुंडलिनीचे वर्णन करतात तेव्हा ते नागाचा व सर्पांचा आधार घेतात. यावरूनही त्यांचे महात्म्य आपल्या लक्षात यावे. सर्पकूळ किती आदिम तर रामचरितमानसमध्ये विनता व कद्रुची एक कथा आली आहे, महाभारताच्या आदिपर्वामध्येही ती येते. दक्ष प्र्रजापतीच्या दोन कन्या, विनता व कद्रु यांनी कश्यप ऋषींसोबत विवाह केला. एकदा प्रसन्न होऊन कश्यप ऋषींनी त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा कद्रुने एक हजार पराक्रमी पुत्रांची आई होण्याचे व विनताने दोनच परंतु कद्रुच्या पुत्रांपेक्षा अधिक पराक्रमी ते असावेत असा वर मागितला. त्याप्रमाणे कद्रुला एक हजार पुत्र झाले. तेच सर्प असे मानले जाते. विनताचे मुलगे अरूण(हा सुर्याचा सारथी) व दुसरा गरूड. तर असे हे महापराक्रमी सर्प. गरूडाने अमृतकुंभ आणून ज्या चऱ्यांवर ठेवला तेथे अमृतकण सांडले असतील म्हणून सर्पांनी ते चरे जिभेने चाटण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची जीभ मधोमध कापली गेली व त्या दोन झाल्या असाही एक संदर्भ महाभारतात आहे तर सर्पांचा उल्लेख महादेवपुराणातदेखील आढळतो. मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र्रमंथन केले तेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते सृष्टीला जाळत असताना महादेवाने ते प्र्राशन केले हे त्यात आलेच आहे परंतु समुद्रात जे विष पसरले होते ते पिण्याचे काम या सर्पांनीच केले आणि मानवजगताला अभय प्रदान केले. नागांचा संदर्भ असा आदिम आहे. आपण पुराणकाळापासून देवघरात ज्या नाग-नरसोबाची पूजा करतो तो म्हणजे नागांप्रती कृतज्ञता भावच आहे. नरसोबा म्हणजे नृसिंह महाराज. प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची ती कथा. दुसरी कथा कालियामर्दनाची, तिसरी कथा जिवत्यांची तर चौथी बुध-बृहस्पतीच्या युद्धाची. या कथा आपल्याला काय सांगतात? केवळ कृष्णाने कालियामर्दन केले, अथवा जिवत्यांनी बाळांना मांडीवर घेऊन जोजावले इतकेच का? नाही नाग-नरसोबाच्या पुजनातून आपण हा बोध घेतला पाहीजे की आपली संस्कृती ही आदिम आहे. तिचा आपण अभिमान बाळगला पाहीजे. एका स्त्रीच्या पोटी सर्प कसे आले, तिने एक हजार अंडे कसे दिले, त्यातून सर्पच कसे बाहेर आले, त्यांनी उच्चैश्रवा घोड्याच्या शेपटीला स्वत:ला बांधून घेऊन आई, कद्रुला विजय कसा मिळवून दिला, विनता कशी तिची दासी झाली, सर्पांच्या दोन जिव्हा कशा झाल्या, त्यांनी विष कसे पचवले यातील चमत्कारांचा भाग आपण सोडून देऊ थोडावेळ परंतु पुराणकाळापासून नागजमात ही मानवाची मदत करत आली आहे, ती अगदी शेतातील उंदीर नष्ट करण्याच्या रूपाने असो किंवा आजच्या मॉडर्न सायन्समधील अनेक औषधे हे सर्पांच्या लाळेपासून अथवा विषापासून बनवण्यात आले आहेत येथपर्यंत असो. या आदिम जमातीने मानवासाठी मैत्रीचा हात नेहमी पुढे केला आहे. मुळात महाभारतात तर त्यांना मानवाचाच नव्हे त्यांच्यापेक्षा प्रगत असल्याचा दर्जा दिला आहे. काही शास्त्रांमध्ये असेही येते की जेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांनी आपल्यासमोरचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपले पितर नागाच्या माध्यमातून येऊन ते प्रश्न सोडवतात. यातीलही अतिशयोक्ती किंवा फॅण्टसीचा भाग आपण सोडून देऊ, त्यांचे दर्शन म्हणजे मानवजातीसाठी एक आश्वासकता घेऊन येते एवढे जरी यातून आपण घेतले तरी सार्थक.
©️प्रशांत भरवीरकर

सोमवार, १८ मार्च, २०१९

उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!


उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!

महाराष्ट्र हा उत्सवप्रिय लोकांचा देश आहे. सण कोणताही असो त्याचे उत्सवी स्वरूप येथील कलारसिक माणसांना आनंद देते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीन उत्सव यापैकीच. उन्हाळ्याच्या सुरूवातीला येणारे हे तीन उत्सव गेल्या काही वर्षांपासून मात्र गोंधळाच्या वातावरणातच पार पडताना दिसत आहेत. असे असले तरीही नाशिककर मात्र अद्यापही परंपरा राखून आहेत. हे तीनही उत्सव त्या त्या पध्दतीने साजरे करण्यातच त्यांना आनंद वाटतो. होळीला गोवऱ्या, लाकडांची रास रचत अमंगलाच्या नष्टतेचा आनंद साजरा केला जातो. धुळवडीला राख फासत पारंपरिकतेला सलाम केला जातो तसेच रंगपंचमीला रहाडींमधून रंग खेळला जातो.
_________
समभाव ही भावना एकमेकांच्या उत्कर्षासाठी असते परंतु त्यामुळे काही बाबींचा ऱ्हासही होतो. एखाद्या भागात अनेक ठिकाणांहून आलेले लोक रहात असतील तर त्यांचे उत्सव एकमेकांवर अतिक्रमण करतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे होळी. नामसाधर्म्यामुळे होळी सणाला आता बऱ्याच अंशी ‘होली’चे स्वरूप येत चालले आहे किंबहुना होळी ही पुरती ‘होली’ बनून गेली आहे. सध्या तरी आजुबाजूला तसेच चित्र पहावयास मिळते. नाशिक मात्र उत्सवांच्या बाबतीत अद्यापही सहीसलामत आहे. येथील रहाडी, दाजिबा वीर, वीरांची मिरवणूक, होळीचा माहोल याला एक वेगळीच चमक आहे.
पारंपरिक उत्सवांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याने पूर्वापार चालत आलेल्या अनेक रूढी परंपरांशी उत्सवांची फारकत होऊ लागली आहे. तसे पाहता होळी, धुळवड (धुलीवंदन) व रंगपंचमी हे तीन वेगवेगळे उत्सव आहेत. होळी म्हणजे अमंगलाचा नाश, धुळवड म्हणजे तीव्र उन सहन करण्याची शक्ती देणारा दिवस आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. परंतु दरम्यानच्या काळात झाले काय की अनेक संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहू लागले व त्यांचे सण समारंभ त्यांच्या पध्दतीने साजरे करू लागले. उत्तरभागातून आलेले अनेक लोक त्यांच्या ‘होली’ची तुलना आपल्या होळीशी करू लागले व होळीच्या दिवशीच होली म्हणजे त्यांची रंगपंचमी साजरी करू लागले. याला आधार मिळाला तो होळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या आपल्या धुळवडीमुळे. आदल्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख धुळवडीच्या दिवशी अंगाला फासण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. राख फासल्याने कमीपणा येतो म्हणून आणि उत्तरेकडील लोक यादिवशी त्यांची ‘होली’ खेळत असल्याकारणाने धुळवडीला रंग खेळण्याची परंपरा जोर धरू लागली. आजही अनेक भागात धुळवडीच्याच दिवशी ‘होली है’ म्हणत मराठी बांधव रंग खेळू लागले. म्हणजेच नामसाधर्म्यामुळे होळीच्या दिवशीच होली (रंगपंचमी) साजरी करण्याचा प्रघात पडला. याचा प्रतिकूल परिणाम असा झाला की येथील लोक होळी खेळली का? होळी है, अशा ललकाऱ्या देऊ लागले. होळी व ‘होली’चा काला होऊन रंगपंचमीपर्यंत चार-पाच दिवस रंगांचा हा उत्सव खेळला जाऊ लागला.
मूळात होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. लाकडांची रास करून ती जाळतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. या उत्सवाला ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यामागे काही धार्मिक कथाही आहेत. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळात उडी मारणारी होलिका ईश्वराच्या सामर्थ्यामुळे जळून खाक झाली ही ती कथा व त्या होलिका शब्दाचा झालेला अपभ्रंश म्हणा किंवा उच्चारामुळे झालेला बदल म्हणा ‘होळी’ असा शब्द निर्माण झाला असावा असा तर्क बांधण्यात येतो. खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला का लावायची तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा आपण सहन करू शकू यासाठी. त्याला आपल्याकडे धुळवड संबोधण्यात येते. हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. मग या दिवशी रंगच का खेळू नये या वृत्तीतून रंगांच्या उत्सवावर अतिक्रमण झाले. धुळवडीलाही रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. रंगपंचमी हा तर रंगांचाच उत्सव तो होळीनंतर लगेचच दोन-चार दिवसांनी येतो.  त्यादिवशी एकमेकांच्या अंगाला रंग लावून खेळाचा आनंद घेतला जातो. अंगाला रंग लावण्यामागे अशी भावना आहे की जितका जास्त रंग खेळाल तितके ऊन कमी लागते. त्यातूनच मग पाण्याचा कमी वापर करावा, इको फ्रेण्डली रंगपंचमी साजरी करावी, नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्यावे वगैरे बाबी प्रामुख्याने आल्या. परंतु सर्वात जास्त गोंधळ झाला तो होळी, धुळवड आणि रंगपंचमी या तिघा उत्सवांची सरमिसळ झाल्याने. गेल्या काही वर्षांपासून बेमालूमपणे हे झाल्याने उत्सवांच्या या अतिक्रमणांचे वाटावे तेवढे वाईट हे थोडेच आहे.
‘होळी’ या एका शब्दापाशी हे उत्सव येऊन खिळले आहेत का याचा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. होळी शब्दाशी जवळीक साधणारा ‘होली’ हा शब्द असल्याने असे झालेय का हे ही तपासून पाहताना मूळ होळी संकल्पनेपासून आपण दूर तर जात नाही ना याकडे गांभीर्याने पाहण्याचीही वेळ आलेली आहे.



शनिवार, २६ मे, २०१८

गोदातरंग


गोदातरंग 
परवा एका कार्यक्रमानिमित्ताने गोदाकाठी जाणं झालं. कधीही गेलं तरी गोदा प्रसन्नच असणार यात नवल नाही. सायंकाळची वेळ होती, ही कातरवेळ मोठी मगेशीर असते. यावेळी नाही नाही ते आठवतं. अशाच आठवणींचा पुंजका समोर घेऊन बसलेलं असताना घरात गांजलेल्या दोन मायलेकी आल्या. दोघीही एकमेकींची खुप काळजी घेत होत्या. पायऱ्यांवर बसल्या. ‘हळूच आई’ म्हणत लेकीने तिला हात दिला. आईला व्यवस्थित बसवून दिलं. एका पायरीवर ती मुलगी बसली. घरात काय चालतं यावर दोघींचं गंभीर बोलणं चाललं होतं, थोडा त्रागा असल्याने ते कानी पडत होतं. बाबांनी समजावून घ्यायला पाहिजे, त्यांनी असं नको वागायला वगैरे. आई मुलीची समजूत घालत होती मुलगी आईच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होती. ‘किती काळजीनं करतेस तू साऱ्यांचं’. ‘माझं जाऊ दे, तू सांग’ असा त्यांचा संवाद रंगात येत असतानाच गोदा जीवाचे कान करून ऐकत होती. तिलाही माहेरवाशिन पोरगी काठावर येऊन दु:ख सांगत असल्यानं ती सुखावली असणारच. एकमेकींचे अश्रु पुसत असतानाच मुलीने विणलेल्या जुन्या पिशवीतून एक स्टीलचा डबा काढला. त्यातून तिने चक्क भजी काढली. एकमेकींचे सुखदु:ख सांगताना आपण घरून बनवून आणलेलं काही खायला पाहिजे, ते ही गोदाघाटी आणून खायला पाहिजे ही भावना ‌किती छान आहे. त्या दोघांचं फार कौतुक वाटलं. त्या रडत होत्या, एकिकडे खाणंही सुरू होतं. थोऽऽऽडं नजरेसमोर आणा...सूर्य बुडालाय. गोदा पिवळसर केशरी प्रकाशात न्हाऊन निघालीय, वटवाघळांचे थवेच्या थवे देवमामलेदार मंदिराहून उडताहेत. मंदिरांमध्ये घंटांचे नाद होताहेत, आरत्या सुरू आहेत. एकिकडे कुणाचा स्नानसंध्या करण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे गोदेला दिवे वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या वातावरणात मायलेकींचा हा खाणसंवाद सुरू आहे. जरा चक्कर टाकण्याचं मन झाल्याने रामकुंडाकडे प्रयाण केलं तर जागोजागी कुटुंबच्या कुटुंब बसलेली. कुठे भत्ता खाण्याचं काम सुरू, कुठं पाणीपुरी तर कुठं घरून आणलेलं जेवण. गोदावरी ही आम्हाला लाभलेली देणगीच आहे. ती कुणाची नाही. तिच्या आश्रयाला आख्खा भारत येऊन राहतो. कधी नाशिकला येणं झालं तर सायंकाळी येथे एक फेरफटका मारायलाच हवा. सराफ बाजारातून जेव्हा आपण गोदेवर प्रवेश करतो तेव्हा क्षणात अलौकीक काहीतरी वाटून जातं. ती मंदिरं, ती छोटी समाधीस्थळं, ती साधुंची वस्ती, ती स्वयंपाकाची जागा. काय नाही गोदेवर. संसारच्या संसार उभे आहेत. गाडगेबाबा पुलावरून उजव्या बाजुला आध्यात्मिकतेचा हा पसारा तर डाव्या बाजुला प्रापंचिक माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दिसतील. शेण्या विकणारे. वाळू विकणारे, माती विकणारे या बाजुला असतात. गाड्या धुण्याचा कार्यक्रम येथेच चालतो. उजवी बाजु सुक्ष्मतेकडे नेणारी तर डावी बाजु जडत्त्वाकडे नेणारी. पण काहीही म्हणा गोदावरी प्रचंड आहे. तिच्या वळचणीला खुपजण आहेत. त्यांना तगायचंय म्हणून आहेत, त्यांना गब्बर व्हायचंय म्हणून आहेत. नीळकंठेश्वराचं मंदिराकडे आपण जातो तेव्हा तेथे भल्या संध्याकाळीही जोतिषांची पंगत बसलेली असते. लोक म्हणतात, त्यांना भविष्य कळतं तर ते तिथं का बसले असते. पण बघा, जेव्हा एखादा गांजलेला तरूण त्यांच्याकडे जाऊन हात पुढे करतो तेव्हा हा त्यांच्यासाठी देवाहून कमी नसतो. त्यांच्याच शेजारी मुळ्याजाळ्या विकणारेही असतात. हे मुळं नक्की काय असतात कुणाला ठाऊक. श्रध्दा अंधश्रध्दा या वादात पडायचं नाही. परंतु त्यांच्या सांगण्याला काही तरी अर्थ असेलच ना. असो तर गोदा सर्वांनाच शरण देणारी आहे.
आता या मायलेकींचं खाणं संपत आलंय. त्यांच्या गप्पाही थांबलेल्या आहेत त्या दोघी शांत आहेत. केवळ पाण्याचा खळखळाट अनुभवताय. त्यांना आता एकमेकींशी काही बोलायचं नाही. गोदेत पडणारी वर्तुळ पाहण्यात त्या मग्न आहेत. पोरासोरांचं खाणंही संपलंय. त्यांनी कागदाची होडी बनवून गोदेत सोडलीय. ती ही खुश आहे. तिला प्रदुषणाची चिंता नाही हो! तिला तो पोरखेळही वाटत नाही तिला त्यांच्या भावना जपायच्याय अन् ती त्याच्याकडेच लक्ष देतेय. गोदा आता शांत आहे. दुरवरून सूर येताहेत...अरेच्चा हे तर जगजीतचे सूर आहेत. ‘ये दौलत भी ले लो...ये शोहरत भी ले लो’

रविवार, २६ मार्च, २०१७

नाथपंथी माधवनाथ महाराज





अवलियांचे जनस्थान : प्रशांत भरवीरकर
----
नाथपंथी माधवनाथ महाराज
वयाच्या दहाव्या वर्षी शैली, शृंगी, कौपिन धारण करणारे, माधवनाथ महाराज नावाचे मोठे अवलिया जनस्थानी होऊन गेले. माधवनाथ महाराजांचे आयुष्य अनेक चमत्कारांनी भरलेले आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. परमहंस माधवनाथ महाराज, शिर्डीचे साईबाबा, पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज व नाशिकचे गोपालदास महाराज यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांचे सूत्र एकमेकांच्या अंत: शक्तीने चालत, असे मानले जाते.
----
नाशिकचे नरसिंग उर्फ गोपालदास महाराज ज्यांना आपले वडील बंधू म्हणून पुकारत ते माधवनाथ महाराज मूळात नाथपंथी होते. त्यांच्याकडे नाथपंथाची चित्रकुटची गादी होती. ‘अवलियांचे जनस्थान’ या शृंखलेत यापूर्वी माधवनाथ महाराजांचा उल्लेख आलेला आहे. ते सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावचे. नाशिकला गोदातिरावर त्यांचा वास होता. येथे अनेक मुमुक्षुंना ज्ञान देऊन त्यांनी सज्ञान केले. गोदातिरी ते गंगागिरी महाराजांच्या सान्निध्यात रहात. माधवनाथ महाराज अज्ञातवासात असल्याने त्यांनी आपले खरे स्वरूप अनेक दिवस प्रकट केले नाही. ते गोदातिरी आपल्याच मस्तीत रहात. कालांतराने त्यांना अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळाले तेव्हा त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला आणि एका अवलियाचे दर्शन जनस्थानवासियांना झाले.
अज्ञातवास संपविल्यावर माधवनाथ महाराज काळाराम मंदिराच्या पूर्व द्वारावर अखंड धूनी पेटवून राहणाऱ्या गोपालदास महाराजांच्या भेटीला गेले. गोपालदास महाराज मौनी म्हणून प्रसिध्द होते, आता हे दोघे साधू एकमेकांशी कसे बोलतात हे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमली तर माधवनाथ महाराजांना पहातच गोपालदास मांडी थोपटू लागले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून माधवनाथ महाराजांनीही मांडी थोपटली. दोघांनाही शड्डू ठोकले, एकमेकांना वाकुल्या दाखवल्या आणि परस्परविरूध्द दिशांना निघून गेले. या पंचायतनाचे सूत्र अंत:शक्तीने चालत हा अनुभव भक्तांना पुन्हा एकदा आला. एकदा तर रामनवमीच्या दिवशी माधवनाथ महाराज गोपालदासांना भेटावयास गेले असता त्यांना कडेवरच उचलून घेतले. नाथांनी त्यांच्या हृदयास आपला कान लावला. संभाषण काहीच नाही. असे हे सूत्र होते.
माधवनाथ महाराज लहान असताना त्यांच्या आई मथुरादेवी त्यांना घेऊन साधू देवमामलेदार यांच्या भेटीला आल्या तेव्हा देवमालेदारांनी त्यांना दुरूनच येताना पाहून ‘हा तर गादीचा मालक माझ्या घरी चालून आला आहे.’ असे उदगार काढले. मथुरादेवींनी देवमामलेदारांना वंदन केले, त्यांनी लहानग्या माधवला उचलून घेतले आणि ‘बाळाचे रक्षण करावे, हा उज्जैयनीचा प्रसाद आहे,’ असे सांगितले त्यावर आई मथुरादेवी यांना माधवच्या जन्माची आठवण झाली.
किशोरवयीन अवस्थेत त्यांचे वास्तव्य अवंती नगरीत होते, तेथे त्या महाकाळाची पूजा करीत. एकदा श्रावणी सोमवारी त्या महाकाळाची पूजा करून ध्यानस्थ बसल्या असता जटाधारी, अंग भस्मांकित, कासे लंगोटी व तेजोवलयांकित असा पुरूष तेथे आला आणि शिवशंकराची पिंड पुजनास देत ‘तू चतुर्सिध्द माता होशील’ असा आशीर्वाद देऊन चालता झाला. पुढे विवाहानंतर गर्भवती असताना त्या चित्रकुट येथे बंधुंच्या भेटीला गेल्या असता, त्यांचे बंधू विठ्ठलनाथ यांनी त्यांना काही दिवस तेथेच ठेवून घेतले. विठ्ठलनाथ हे महायोगी होते. केवळ दुर्वांचा रस प्राशन करून त्यांनी तपाचरण केले होते. त्यांच्या मठाखाली एक मोठी गुंफा होती. तेथे आदिनाथांची समाधी असून नाथांचे ते मूळस्थान म्हणून प्रसिध्द आहे. नाथांचे मोठे मंदिर स्थापन करून विठ्ठलनाथ येथे रहात असत. मथुरादेवी अशा पावन ठिकाणी असताना दिवसभर पूजेत मग्न रहात असत. तो दिवस होता, शके १७७९. चैत्र शुध्द प्रतिपदा. २६ मार्च १८५७. सूर्योदयाच्या समयी व्यंकटेश बालाजीस प्रदक्षिणा घालत असताना त्यांना प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, मोठ्या आनंदाने विठ्ठलनाथांनी त्याचे नाव माधव ठेवले.
क्षणार्धात मथुरादेवींना हा काळ डोळ्यासमोर झळकला. देवमामलेदारांनी आठवण करून देताच मथुरादेवींना हा देवाचा प्रसाद असल्याचे जाणवले. पुढे देवमामलेदारांनी सांगितले की आता पुन्हा चित्रकुटाचे बोलावणे येणार आहे, तेव्हा तेथे जाऊन जे काही मिळेल त्याचा स्वीकार करावा. पांगरीला परतल्यावर लगेचच माधव यांना चित्रकुटाचे बोलावणे आले. विठ्ठलनाथांची गादी रिकामी झाली असल्याने तेथे कुणास बसवावे अशा विचारात सर्वजण असताना चिठ्ठया टाकण्यात आल्या आणि त्यात लहानग्या माधवचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना तातडीने चित्रकुटास बोलाविण्यात आले होते. अशाप्रकारे वयाच्या केवळ दहाव्या वर्षी माधवचे माधवनाथ महाराज झाले. पुढे माधवनाथ महाराज चित्रकुटला शैली, शृंगी, कौपिन धारण करून नाथवेषात सदैव आपल्याच मस्तीत रहात. भोजनाची शुध्द नाही, कधी उपवास तर कधी दुग्धपान करीत. ते नाथपंथी असूनही त्यांच्या गळ्यात कायम तुळशीची माळ असे. पुढे माधवनाथांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांच्या विवाहाचा धोशा लावला मात्र माधवनाथ महाराजांना विवाह पसंत नसल्याने त्यांनी स्थानत्याग केला आणि भारत दर्शनासाठी निघाले. नाथांची सर्व ठिकाणे फिरल्यावर बारा वर्षांनी ते येऊन पुन्हा चित्रकुटास आले. मात्र तेथे चमत्कार करण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांना अज्ञातवासात राहण्याचा आदेश केला. त्यानुसार माधवनाथ महाराज कासे लंगोटी लावून निघाले. पुढे ते पिशाच्चवृत्ती धारण करून फिरत राहिले. इंदूरहून महूस, तेथून धारानगरीस, खांडव्यास, तेथून चाळीसगावास आले. पोहेरगावी असताना रंभा पाटील यांच्याकडे धोंड्या नावाने राहू लागले. तेथे ते शेताची राखण करीत. मात्र एकदा हरिभजनात मग्न असताना एका मस्तवाल बैलाने शेताची नासधूस करून टाकली. पाटलीन बार्इंनी त्यांना भलेबुरे ऐकवले तेव्हा ‘५२ मण गहू पिकतील’ असे सांगून गावाबाहेर जाऊन राहिले. त्याप्रमाणे तितके गहू पिकताच पाटील त्यांना घ्यायला परत आले, मात्र ते गेले नाही. पुढे येसगाव नावाच्या खेडगावी ते राहिले. तेथे ते लहान मुलांना शिकविण्याचे काम करीत. तेथे त्यांच्या विवाहाचा विचार गावकऱ्यांनी केल्याने तेथून निघून ते रोझे गावी आले. येथे जर्जरी जरबंक्ष नावाचे नाथांचे ठिकाण आहे. येथे भिकनशावली नावाचे एक फकीर रहात त्यांना भेटताच माधवनाथ महाराजांना अंतरीची खूण पटली आणि त्यांनी भिकनशावली यांना कडकडून मिठी मारली. तेथून ते पांगरीला आले. पांगरीला काही दिवस मुक्काम करून लासूर गावी गेले. येथे गंगागीर महाराज म्हणून मोठे हरिभक्त होते. लाक्षायणी देवीच्या मंदिरात भजन सुरू असताना गंगागीर महाराज माधवनाथ महाराजांच्या पायी लागत ‘हा दिव्य सत्पुरूष आहे’ असे सांगू लागले मात्र माधवनाथ महाराजांनी त्यांना अज्ञातवासाच्या व्रताची आठवण करून दिली.
काही दिवसांनी माधवनाथ महाराज सप्तशृंग गडावर आले. येथेही त्यांनी अनेक चमत्कार केले. दोन महिने गडावर वास्तव्य केल्यावर नाशिकला गोदातिरी आले आणि अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळताच लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला. नाशिकला असताना सार्वजनिक सुखप्राप्तीसाठी त्यांनी विद्वानांकरवी सप्तशती ग्रंथाचे पाठ करून सात दिवस यज्ञ केला. पुर्णाहूतीच्या दिवशी नाथांनी तुपाची धार यज्ञकुंडात धरली असता त्यातून मोठ्या ज्वाळा प्रकटून गगनाला भिडलेल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. याच यज्ञात त्यांनी साडी चोळी अपर्ण केली, यज्ञ संपल्यावर ती न जळता तशीच्या तशी निघाल्याची आख्यायिका आहे. नाशिकला त्यांचा हरिसिंग नावाचा मोठा भक्त होता. त्याच्या घरी ते बसत, तेथे मुमुक्षु त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येत असत. एकदा सुकेणेकर जहागिरदार नाथांच्या भेटीस आले, घरी चोरी झाल्याचे वृत्त त्यांना सांगितले तेव्हा एकवीस दिवसात चोर स्वत: घरी येईल. असे सांगून माधवनाथ महाराजांनी समाधी लावली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दागिने चोरांनी स्वत:हून आणून दिले. याच हरिसिंगांच्या घरी एकदा एकादशीच्या दिवशी महाराज कीर्तन करीत असताना काळ्या वर्णाची ठेंगणी मूर्ती असलेला एक तापसी त्यांच्याजवळ येऊन बसला. नाथांनी खुणेनेच हरिसिंगाच्या मुलाला दर्शन घेण्यासाठी सांगितले तर क्षणार्धात मूर्ती अंतर्धान पावली. (असा उल्लेख माधवनाथ महाराजांच्या पोथीत आहे.) प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर माधवनाथ महाराजांना पळसे गावाहून आमंत्रण आले. तेथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तो काळ होता १९०१. या नामसप्ताहात पळसे गावाला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. दहा हजाराहून अधिक भजनी मंडळी स्वत:हून तेथे आली. माधवनाथ सतत नामस्मरणात राहिले. सतत अन्नदान सुरू होते. येथे दर्शनार्थी इतके झाले की नाथांचे पाय सुजून गेले. शेवटी भक्तांनी त्यांना एका मोठ्या झाडावर उच्च आसन करून तेथे बसवले व दर्शनार्थींना दुरून दर्शन घेण्याची विनंती केली, अशी आठवण सांगितली जाते. या ठिकाणी त्यांनी जानोरी (ता. दिंडोरी) येथील त्यांचा शिष्य काशिनाथ शिंपी यास योगक्रिया शिकवली. त्यानंतर अनेक दिवसांनी ते पांगरीस आले. तेथे एका उकीरड्यावर बसून ध्यानावस्थेत गेले व जमलेल्या लोकांना म्हणाले. चित्रकुट येथील व्यंकटेशाचे प्रतिमंदिर येथे व्हावे, असे वाटते. मग काय लोक कामाला लागले. पांगरीस असलेले श्रीविष्णुचे मंदिर ही चित्रकुटची प्रतिकृती आहे. तेथून माधवनाथ महाराज पुण्यास गेले. त्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले असता भगूर येथील भिकूशेठ या गृहस्थाला सज्ञान केले.
माधवनाथ महाराज खऱ्या अर्थाने लोकनायक होते. लोकांचे दु:ख, पीडा त्यांनी दूर केल्या. एकनाथ षष्ठी, १४ मार्च १९३६ रोजी हिंगणघाट (जि.वर्धा) येथे त्यांनी देह ठेवला. त्यांच्या आज्ञेनुसार इंदूरला त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. अशा या माधवनाथ महाराजांची प्रतिमा नारोशंकर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या नरसिंग महाराजांच्या समाधी मंदिरात लावण्यात आली आहे. या पंचायतनाची भक्त मनोभावे पूजा करतात.
________                

अवलियांचे जनस्थान



अवलियांचे जनस्थान 
----------- 
दलदलीत राहणारे गोपालदास महाराज
गोपालदास महाराज काही विक्षिप्त शब्दांचा उच्चार करीत असत. त्यांची भाषा व बोलण्यातील रहस्य सर्वसामान्य माणसाला समजण्यापलिकडे होते. हातवारे, खाणाखुणा व भाषा याचे रहस्य हे फक्त त्यांचे निकटवर्तीय वंदनीय श्री माधवनाथ महाराज हेच जाणीत. माधवनाथ महाराजांना ते मोठे बंधू म्हणत असत. परमहंस शिलनाथ महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज व नाशिकचे गोपालदास महाराज यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांच्या अंत: शक्तीने एकमेकांचे सुत्र चालत असत.
----------
गोपालदास उर्फ नरसिंग महाराज हे परमहंस योगी नाशिक येथे कोठून, केव्हा व कसे आले हे सर्व अज्ञात आहे. नाशिकच्या गोदावरीकाठी भाट्यांची धर्मशाळा होती या धर्मशाळेच्या पाठीमागील बाजूस आळवांची बाग होती. तेथे सतत दलदल व चिखल असे या दलदलीत गोपालदास महाराज पहुडलेले सर्वप्रथम लोकांनी पाहिले. हा कोणीतरी वेडसर मनुष्य आहे असा लोकांचा समज होता परंतु ते दृष्यही केविलवाणे होते त्यामुळे त्यांना कुणी चिखलातून बाहेर काढीत, बाजूला बसवित. ते पुन्हा त्या चिखलात जाऊन पहुडून घेत. लोकांनी त्यांना चिखलातून बाहेर काढावे आणि त्यांनी जाऊन पुन्हा चिखलात पडून घ्यावे असा दिनक्रम कित्येक दिवस सुरू होता. कधी कधी त्यांच्याभोवती सर्प वेटोळे घालून बसलेले असत तर कधी त्यांच्या अंगावर नाग खेळत असताना दिसे. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दिवसा नाग त्यांच्या डोक्यावर फणा धरून उभे रहात असत असे अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कुणीही करीत नसत. जवळजवळ तीन वर्षे ते याच अवस्थेत होते. लोकांनी यावे पहावे, पुढे जावे. काहींनी त्यांना चिखलातून बाहेर काढावे यांनी पुन्हा चिखलात जावे असे सत्र सुरूच राहिले. डोक्यावर केस अस्ताव्यस्त व वाढलेले, लांबसडक दाढी, अंगावर कपडे नाहीत. ते दिगंबर अवस्थेत असताना त्यांना कित्येकांनी लंगोट नेसवावे, ती ही ते काढून फेकायचे. एकदा नाशिकमधील महान विभूती नांदगावकर यांनी नरसिंग महाराजांना त्या अवस्थेत पाहिले. नांदगावकर हे अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती होते. त्यांनी तात्काळ ताडले की हे साधेसुधे, वेडसर सत्पुरूष नसून विदेही अवस्थेतील महान सतपुरूष आहे. त्यांनी या सत्पुरूषास दलदलीतून काढून राममंदिरात नेऊन बसविण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी या अवलियास चिखलातून काढून पवित्र गोदावरीच्या काठी रामकुंडावर नेऊन गोदामातेच्या जलाने सन्मानपूर्वक स्नान घातले. व राममंदिराच्या पूर्व दरवाजाच्या ओसरीवर आणून उभे केले. लोकांनी अन्न आणून द्यावे तर ते खात नसत. कधी कोणी घास भरविला तर थोडेसेच खात असत. ते कुणाशीही बोलत नसत. दीड वर्षांपर्यंत ते राममंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ उभे होते. दीड वर्षांनंतर त्यांनी बैठकीचा नियम केला. तेव्हापासून त्यांनी धुनी ठेवण्याचा क्रम ठेवला. काही विक्षिप्त शब्दांचा ते उच्चार करीत असत. त्यांची भाषा व बोलण्यातील रहस्य सर्वसामान्य माणसाला समजण्यापलिकडे होते. हातवारे, खाणाखुणा व भाषा याचे रहस्य हे फक्त त्यांचे निकटवर्तीय वंदनीय श्री माधवनाथ महाराज हेच जाणीत. माधवनाथ महाराजांना ते मोठे बंधू म्हणत असत परमहंस शिलनाथ महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज व नाशिकचे गोपालदास महाराज यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांच्या अंत: शक्तीने एकमेकांचे सुत्र चालत असत.
गोपालदास महाराज नेहमी ॐ नरसिंग या मंत्राचा जप करीत त्यामुळे पुढे त्यांना नरसिंग महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ते बसत असलेल्या समोरच्या खांबास त्यांनी आपल्या ध्यानदेवतेचे अनुष्ठान केले होते. या खांबास ते कोणालाही टेकून बसून देत नसायचे. त्यांना गोरेसू गांजा व साधा गांजा ओढण्याची सवय होती. ‘हे तो माप मापना है’ असे त्यांचे नित्य वचन असे कारण ते व्यसन नव्हते तर नुसताच देखावा होता.
शेगावचे गजानन महाराज यांना गोपालदास महाराज पूजनीय मानत एकदा गजानन महाराज नाशिकला येणार होते तेव्हा सकाळपासून गोपालदास महाराज आज माझा बंधु गजानन र्वहाडातून येणार आहे असे ते सारखे म्हणत होते. त्याप्रमाणे गजानन महाराज काळाराम मंदिरात त्यांच्या दर्शनाला आले. गोपालदास महाराजांनी त्यांचा आदरसत्कार केला. त्यांना नारळ, खडीसाखर, फुले अर्पण केली. तेथून पूर्व दरवाजाने मंडळींच्या घोळक्यासह महाराजांच्या मठात येऊन समोर पिंपळाच्या पारावर अर्धा तास बसले. ते उभयता एकमेकांशी काय पुटपुटले हे कोणालाही समजले नाही. साधुची खुण साधूच जाणे, इतरांना ते अगम्य होते. 
श्री माधवनाथ महाराजांची स्वारी नाशिकला आली की ते गोपालदास महाराजांची भेट घेत श्री माधवनाथ महाराज श्रीराम मंदिरात आल्यावर या दोघांची गुप्त भाषेत काहीतरी देवाणघेवाण होत असे. कधी दंड थोपटणे, कधी मुखातून मोठ्याने आवाज काढून वाकुल्या दाखवणे, कधी एकमेकांना कडकडून मिठी मारणे असेल प्रकार ते करीत असत.
गोपालदास महाराजांची एक आठवण श्री साईचरित्रात अध्याय ३३ मध्ये सारांशने आलेली आहे. सन १९१७ मध्ये गुरूपौर्णिमेला डहाणूचे हरिभाऊ कर्णिक शिर्डीला साईबाबांच्या भेटीला गेले होते. दर्शन झाले, पाद्यपुजा झाली आणि दक्षिणा देऊन हरिभाऊ द्वारकामाईची पायरी उतरून निघाले. मात्र त्यांना अचानक वाटले की साईबाबांना आणखी एक रूपया दक्षिणा द्यावी परंतु एकदा बाबांनी दर्शन दिल्यावर पुन्हा जाणे उचित नाही असे समजून आपली इच्छा मनाशी दाबून टाकत ते निघून आले. पुढे काही दिवसांनी त्यांचे नाशिकला येणे झाले. ते नाशिकला श्रीकाळाराम मंदिरात गोपालदास महाराजांच्या दर्शनासाठी आले असता त्यांना पाहताक्षणी गोपालदासांनी आसनावरून उठून जात त्यांचा मणिबंध पकडला आणि ‘माझा रूपया देङ्क असे म्हणाले. त्यांच्या अंतर्यामीपणाचे हरिभाऊंना नवल वाटले. संकल्पाचा रूपया सतपुरूष संकेताने स्विकारतात याबद्दल ही आख्यायिका सांगितली जाते.
गोपालदास महाराज यांचे प्राणीमात्रावर फारच प्रेम होते. गायल कुत्रे, पोपट, कबूतर त्यांना फार प्रिय होते. असे कित्येक प्राणी त्यांच्या मठात होते. त्यांनी शेवटपर्यंत गाईची सेवा केली. एकदा तर पावसाळ्यात गोदावरीला महापूर आलेला होता गोदावरी पात्रातील नारोशंकर मंदिराच्या कळसावर एक माकड अडकून पडले होते. आता काय करावे या विवंचनेत लोक असताना गोपालदास महाराज लिलया पाण्यावरून चालत गेले आणि माकडाला वाचवले अशी आख्यायिका सांगितली जाते. १३ फेब्रुवारी १९२० माघ वद्य दासनवमी, शके १८४१ पहाटे सव्वा चार वाजेच्या ब्रह्ममुहुर्तावर काळाराम मंदिराच्या पूर्वदरवाजात ध्यानयोगी परमहंस गोपालदास महाराज समाधी अवस्थेतच ब्रह्मत्त्वात विलीन झाले. असे म्हणतात की, त्यावेळी त्यांचे आसन जमिनीपासून सव्वा हात उंच झाले होते. महाराजांच्या प्राणोत्क्रमणाच्यावेळी त्यांच्याजवळ जे होते त्यांनी लिहून ठेवले आहे की, महाराजांनी समाधी लावली तेव्हा घारीसारखा मोठा पोपट काळाराम मंदिराच्या कळसावर येऊन घिरट्या घालत होता. समाधीप्रसंगी हा पोपट उफराटा होऊन अंगणात पडला आणि बघता बघता अदृश्य झाला.
परमहंस श्री गोपालदास महाराज यांची समाधी त्यांनी निर्देशित केलेल्या जागेत म्हणजेच लक्ष्मणरेषा वाघाडी गोदावरी व सरस्वती या त्रिवेणी संगमातील एका मोठ्या खडकावर आहे. नरसिंग महाराज सेवा मंडळाने सन २००४ मध्ये या ठिकाणी भव्य समाधी मंदिर उभे केले आहे. समाधीस्थानावर समाधी व पादुकांची नित्य स्नान पुजा धूप दीप आरती नैवद्य सायंकाळची आरती असा दिनक्रम आहे. याशिवाय गुरूपौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा, दीपोत्सव, गुढीपाडवा, नववर्षारंभ व माघ वद्य दासनवमीला महाराजांच्या पुण्यातिथीचे औचित्य साधून महाअभिषेक पालखी महाआरती महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. अशा या अवलियाच्या आठवणीने आजही जनस्थान कंपित होते.  
     

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...